निपाणी : निपाणी मुरगूड रस्त्यानजीक असणाऱ्या बाळूमामा नगर व बालाजी नगर मधील रहिवाशांना मूलभूत सुविधा न दिल्यामुळे या दोन नगरा मधील प्लॉट विक्री करण्यास उपजिल्हाधिकाऱ्यांनी मनाई केली आहे. तसे पत्र चिकोडीच्या उपजिल्हाधिकाऱ्यांनी निपाणीच्या उपनिबंधकांना दिले आहे.
बाळूमामा नगर व बालाजी नगर मधील रहिवाशांना गेल्या अकरा वर्षापासून मूलभूत सुविधांपासून वंचित रहावे लागत आहे. यासाठी या दोन्ही नगरातील रहिवाशांनी जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी चिकोडीच्या उपजिल्हाधिकाऱ्यांना प्रत्यक्ष घटनास्थळाची पाहणी करून कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार उपजिल्हाधिकारी यांनी दोन्ही नगरास भेट देऊन वस्तुस्थिती जन्य परिस्थितीची पाहणी केली होती.
या नगरांमध्ये मूलभूत सुविधा नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आल्यामुळे त्यांनी या दोन्ही नगरांमधील उर्वरित प्लॉट विक्री करण्यास प्रतिबंध केला आहे.तसे पत्र त्यांनी निपाणी उपनिबंधकांना दिले असून त्याची प्रत निपाणीचे तहसीलदार आणि काेडणीच्या पिडीओंना ही पाठवले आहे. जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकारी यांनी घेतलेल्या या निर्णयाबद्दल या दोन्ही नगरातील रहीवाशांच्यामधून समाधान व्यक्त केले जात आहे.