निपाणी (वार्ता) : ऊसाच्या शेतामध्ये लोंबकळणाऱ्या विद्युत वाहिन्यांचे घर्षण होऊन शिवापुर वाडी येथील ऊसाला आग लागली. त्यामध्ये सहा एकरातील ऊस जळून खाक झाला. परिसरातील शेतकऱ्यांनी सतर्कता दाखवून पुढील काही सयामधील ऊस तोडून टाकल्याने मोठा अनर्थ टळला.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, शिवापूरवाडी येथे जोमा, कुरणे, बन्ने, चव्हाण, खोत यांच्यासह अनेक शेतकऱ्यांची शेती आहे. गुरुवारी (ता.३१) दुपारी ऊस शेतातून गेलेल्या विद्युत वाहिन्यांच्या घर्षणामुळे अचानक ऊसाला आग लागली. त्याची माहिती मिळताच परिसरातील शेतकऱ्यांनी स्वतःहून उसाच्या पुढील बाजूस असलेल्या ऊस शेतातील काही सऱ्यांची तोड केली. त्यामुळे मोठे नुकसान टळले आहे. या आगीमध्ये संजय जोमा, दत्तू जोमा अण्णासाहेब जोमा, आप्पासाहेब खोत, रमेश खोत, कादर सनदी, उमेश खोत, यांच्यासह परिसरातील शेतकऱ्यांचा ऊस आगीच्या भक्षस्थानी पडला.
रयत संघटनेचे कार्याध्यक्ष राजू पोवार म्हणाले, अनेक वर्षापासून शॉर्टसर्किटने शेकडो एकरा मधील ऊस शॉर्टसर्किटने जळाला आहे. त्याबाबत संघटनेतर्फे त्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी केली होती. पण अजूनही अनेकांना भरपाई मिळाली नाही. आता या प्रश्नासाठी रयत संघटना आंदोलन करणार असून तात्काळ पाहिजे त्यांना करून संबंधितांना नुकसान भरपाई देण्याची मागणी केली.
यावेळी तलाठी उमेश कोळी, सहाय्यक राजेखान कुरणे, सुनील केसापुरे यांनी पंचनामा केला. यावेळी रावसाहेब बामणे, जगदीश जोमा, काकासाहेब जोमा, अभिनंदन खोत, रवी चव्हाण, शाम चव्हाण, सागर जोमा, रावसाहेब बामणे, रावसाहेब गळतगे, नागोजी जोमा यांच्यासह रयत संघटनेचे कार्यकर्ते, युवक शेतकरी उपस्थित होते.
—