बेळगाव : पुणे – बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील तवंदी घाटात भरधाव वेगात आलेल्या ट्रकने चार वाहनांना धडक दिली. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून 15 प्रवासी जखमी झाले आहेत. नारायण नागू परवाडकर (वय 65) रा. जांबोटी असे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. गुरुवारी सकाळी हा अपघात झाला.
जांबोटी (ता. खानापूर) येथून क्रुझर वाहनातून प्रवाशी कोल्हापूर येथे जोतिबा व महालक्ष्मी दर्शनासाठी निघाले असता ट्रकने चार वाहनांना धडक दिली. सर्व वाहनांचे मोठे नुकसान असून अपघातात गंभीर जखमींना बेळगावच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे. अपघातास कारणीभूत असलेला ट्रक सुमारे तीनशे फूट घसरून महामार्गाच्या बाजूला असलेल्या शेतात जाऊन कलंडला.
शंकर मोहन परवाडकर (वय 28 वर्षे), रेश्मा राजेंद्र कूरतुडकर (वय 45 वर्षे) हे गंभीर जखमी झाले. मोहन नागु परवाडकर (वय 57), विद्या मोहन परवाडकर (वय 47), प्रतीक्षा मोहन परवाडकर (वय 22), प्रियांका मोहन परवाडकर (वय 25), पूनम महेश देवळे (वय 26), आयेशा महेश देवळे (वय 5), आयुष महेश दिपावली (वय 3), सुहास बबली परवाडकर (वय 40), स्वाती सुहास परवडकर (वय 12), वैष्णवी मोहन घडे (वय 25), प्रमोद मारुती परवडकर (वय 26) हे किरकोळ जखमी झाले आहेत.
सकाळी तामिळनाडूहून कोल्हापूरकडे नारळ घेऊन जाणारा ट्रक तवंदी घाटातील तिसऱ्या धोकादायक वळणावर येताच चालकाचे नियंत्रण सुटले आणि कोल्हापूरच्या दिशेने जाणाऱ्या प्रवासी वाहनावर पलटी झाला. कार महामार्गाच्या पलीकडे गेली आणि मागून ट्रकला जोरदार धडक दिल्याने पलटी झाली. यावेळी या कारची कोल्हापूर बाजूकडून बेळगावकडे जाणाऱ्या दोन कार आणि एका दुचाकीला धडक बसली. महामार्गावर वाहने आडवी झाल्याने महामार्गावरील वाहतूक दोन तास ठप्प झाली होती आणि महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या. अपघातास कारणीभूत असलेला ट्रक चालक, क्लिनर फरार झाला आहे. मात्र काही वेळाने पोलिसांनी चालक आणि क्लिनरला अटक केली.
Belgaum Varta Belgaum Varta