निपाणी (वार्ता) : अहिंसा परमो धर्मः असा संदेश देणाऱ्या तसेच संपूर्ण जगाला पंचशील तत्त्वे देणाऱ्या भगवान महावीर यांचा जन्मकल्याणक सोहळा गुरूवारी (ता.१०) शहरासह परिसरात साजरा करण्यात आला. यावेळी ठिकठिकाणी भगवान महावीर यांच्या प्रतिमेची मिरवणूक आणि शोभायात्रा काढण्यात आली.
शहरातील गुजरी पेठ येथील चंद्रप्रभू श्वेतांबर बस्तीमध्ये भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव साजरा करण्यात आला. यानिमित्त दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम झाले. भगवान महावीर जन्मकल्याण महोत्सवानिमित्त सकाळी भगवान महावीर स्वामी यांच्या प्रतिमेची पालखीतून मिरवणूक काढण्यात आली. गुरुवार पेठ, कोठीवाले कॉर्नर, जवल एजन्सी, अशोकनगर, कित्तूर चन्नम्मा चौक, रविवार पेठमार्गे जैन मंदिरात शोभायात्रा आणि वरघोडा मिरवणूकीची सांगता झाली.
यावेळी श्रावक-श्राविकांनी भगवान महावीर यांच्या नामाचा जयघोष केला. रात्री भगवान महावीर यांच्या मूर्तीचा अभिषेक, शांतीधारा, विधान पूजा व मंगल पाळणा सादर करण्यात आला. कार्यक्रमास श्री चंद्रप्रभू स्वामी ५२ जिनालय, १००८ जैन नेमिनाथ, जैन शेतवाळ बस्ती मंदिर ट्रस्ट कमिटीचे पदाधिकारी, ट्रस्टी, संघाचे सदस्य व श्रावक-श्राविक उपस्थित होत्या. प्रसाद वाटपाने सोहळ्याची सांगता झाली.