निपाणी : निपाणी शहरातील अनेक कुटुंबीयांनी यंदा पर्यावरणपूरक पद्धतीने घरगुती गणेशाचे विसर्जन करून समाजासमोर आदर्श ठेवला. काहींनी मूर्ती दान केल्या, तर काहींनी घरातीलच पाण्याच्या पिंपामध्ये विसर्जन करून पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला.
येथील सटवाई रोडवरील प्रल्हाद बाडकर परिवाराने सलग १२व्या वर्षी घरगुती पद्धतीने पाण्याच्या बॅरलमध्ये गणपती विसर्जन करून पर्यावरणपूरक उपक्रम राबविला. त्याचप्रमाणे साखरवाडीतील पर्यावरणप्रेमी अशोक राऊत व प्रदीप जाधव कुटुंबीयांनीही घरच्या घरी पिंपामध्ये गणेशाचे विसर्जन केले.
या प्रक्रियेत मूर्तीच्या विसर्जनासाठी घरातीलच पाण्याचा वापर करण्यात आला. विसर्जनानंतर मूर्तीची माती वेगळी करून तिचा उपयोग झाडे, रोपे व बागेसाठी करण्यात येणार आहे. गौराईचे निर्माल्य खत म्हणून वापरले जाणार आहे.
“घरच्या घरी विसर्जन, पर्यावरण रक्षण” हा संदेश देत अशा उपक्रमांतून प्रदूषण टाळण्याचे आवाहन संबंधित कुटुंबीयांनी समाजाला केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta