निपाणी : निपाणी शहरातील म्युनिसिपल हायस्कूलच्या पटांगणावर काही दिवसांपासून अवजड वाहनांचे पार्किंग सुरू असल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. या मैदानावर चिखल व खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण होत असून क्रीडाप्रेमी युवकांसह परिसरातील शाळकरी मुलांचे हाल होत आहेत.
नगरपालिकेच्या वतीने चालवल्या जाणाऱ्या या शाळेत कन्नड, उर्दू, मराठी यांसोबत इंग्रजी माध्यमाची शाळाही सुरू आहे. दरवर्षी या मैदानावर क्रीडा स्पर्धा, राजकीय सभा तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. तसेच सकाळ-संध्याकाळ अनेक युवक येथे क्रिकेट खेळण्यासाठी येत असतात. मात्र, सध्या पावसाळ्यामुळे मैदानावर पाणी साचून राहते. त्यातच अवजड वाहनांचे पार्किंग केल्याने मैदान दलदलीत बदलत आहे.
परिसरात भटक्या जनावरांची वर्दळ वाढल्याने मैदान व शाळेचे वहरांडे अस्वच्छ बनले आहे. शहरातील एकमेव मोठे मैदान अशी अवस्था झाल्यास खेळाडूंना मोकळ्या जागेपासून वंचित राहावे लागणार, अशी भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.
या संदर्भात माजी नगरसेवक मज्जिद सय्यद यांनी नगरपालिकेचे लक्ष वेधत तत्काळ नोटीस काढून वाहनचालकांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. अन्यथा मैदानाचे वाहनतळात रूपांतर होईल.
Belgaum Varta Belgaum Varta