विविध हिंदुत्ववादी संघटनांची मागणी; तहसीलदारांमार्फत वरिष्ठांना निवेदन
निपाणी(वार्ता) : जम्मू आणि काश्मीर राज्यातील हजरतबल दर्यातील मुख्य प्रार्थनागृहाबाहेर असणाऱ्या फलकावरील भारताचे राष्ट्रचिन्ह ‘अशोक स्तंभ’ काही धर्मांध आणि देशविघातक घटकांनी तोडून टाकले आहे. त्याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर प्रसारित झाला आहे. या गैरकृत्यामुळे भारतीय अस्मिता, संविधान आणि सार्वभौमत्वावर केलेला थेट हल्ला आहे. हा देशाच्या राष्ट्रीय चिन्हाचा अपमान आहे. या हल्ल्याला ‘दहशतवादी हल्ला’ संबोधून दोषींवर कठोर कारवाई या मागणीचे निवेदन येथील विविध हिंदुत्ववादी संघटनांनी तहसीलदारांना दिले.
निवेदनातील माहिती अशी, काही राजकीय पक्षाच्या नेत्यांनी या देशद्रोही कृत्यांचे समर्थन केले आहे. त्यामुळे त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे. अशोक स्तंभ हे केवळ एक शासकीय चिन्ह नाही, तर ते भारताच्या गौरवाशाली इतिहास व घटनात्मक मूल्यांचे सर्वोच्च प्रतीक आहे. अधिनियम १९७१’ आणि ‘भारतीय राजचिन्ह अधिनियम २००५ नुसार राष्ट्रचिन्हाचा अवमान करणे हा गंभीर आणि दखलपात्र गुन्हा आहे.
अशा घटना मधून समाजात जाणीवपूर्वक तेढ निर्माणकरण्याचा प्रयत्न आहे. हे कृत्य धोकादायक पायंडा पाडणारे असून याला वेळीच रोखले नाही, तर त्याचे पडसाद संपूर्ण देशभर उमटतील असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.
निवेदनाच्या प्रती पंतप्रधान, राज्यपाल आणि जिल्हाधिकाऱ्यांना पाठविण्यात आल्या आहेत. अमोल चेंडके, सागर श्रीखंडे, बबन निर्मले यांनी मनोगत व्यक्त केले. तहसीलदार मुजफ्फर बळीगार यांनी निवेदन स्वीकारून वरिष्ठाकडे पाठविण्याचे आश्वासन दिले. यावेळी बाळासाहेब तराळ, राहुल बर्गे, अशोक सूर्यवंशी, अभिनंदन भोसले, अजित पारळे, संतोष देवडकर, राजेश आवटे, संतोष मोरे, महेश मठपती, योगेश चौगुले, संदीप जाधव, उदय पाटील, प्रथमेश पाटील, अभिजीत पाटणकर यांच्यासह विविध हिंदुत्ववादी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta