निपाणी (वार्ता) : राज्यातील मराठा समाजाच्या जातनिहाय गणनेत सर्वांनी सक्रिय सहभाग घ्यावा. सर्वेक्षणासाठी येणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना योग्य, खरी माहिती द्यावी. सहभाग टाळल्यास मराठा समाजाचे नुकसान होईल, असा इशारा विधानपरिषद सदस्य आमदार एम. जी. मुळे यांनी दिला.
येथील सकल मराठा समाजतर्फे बुधवारी (ता.१७) मराठा मंडळात आयोजित मार्गदर्शन बैठकीत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष प्रवीण भाटले-सडोलकर, तर प्रमुख पाहुणे म्हणून कर्नाटक राज्य मराठा फेडरेशनचे अध्यक्ष श्यामसुंदर गायकवाड उपस्थित होते.
बैठकीच्या प्रारंभी व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते धर्मवीर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन झाले. विनोद साळुंखे यांनी स्वागत केले.
क्षत्रिय मराठा समाजाच्या राज्य उपाध्यक्षा सुमित्रा उगळे यांनी प्रास्ताविक करताना मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत सविस्तर माहिती दिली.
“मराठा समाजाने उदासीनता झटकून कामाला लागले पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांनी बेंगलोर परिसरात वास्तव्य करून बरीच कामे केली आहेत; मात्र कर्नाटकातील स्मारकांची दुरावस्था हे दुर्दैव आहे. शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, आर्थिक, नोकरी, व्यवसाय या सर्व क्षेत्रात मराठ्यांना आरक्षणाची गरज आहे. आरक्षणाशिवाय समाजाच्या प्रगतीचा मार्ग नाही,” असे आमदार मुळे म्हणाले.
गायकवाड म्हणाले, “राज्यातील सर्व मराठा एकच आहेत. ३-बी मधून २-ए वर्गात समावेश झाल्यास आरक्षणासाठी झगडावे लागणार नाही. गेली ३० वर्षे सुरू असलेल्या या लढ्यासाठी समाजाने एकत्र यावे.”
बंडा घोरपडे यांनी सर्वेक्षणातील माहिती देताना काळजी घेण्याबाबत मार्गदर्शन केले. बैठकीस निपाणी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष राजेश कदम, उद्योजक रोहन साळवे, चिकोडी जिल्हा मराठा समाज अध्यक्ष अनिल माने, नगरसेवक रवींद्र शिंदे, बाळासाहेब देसाई-सरकार, सुजय पाटील, श्रीमंत दादाराजे देसाई, प्रा. बाळासाहेब देसाई यांच्यासह निपाणी व परिसरातील मराठा बांधव उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta