

मराठी भाषिकांतून तीव्र नाराजी ; कन्नड सक्तीचा जोर कायम
निपाणी (वार्ता) : कर्नाटक-महाराष्ट्राच्या सीमेवर असलेल्या निपाणी शहरातील हायटेक बसस्थानकावर मराठी फलक पुन्हा एकदा गायब झाला असून मराठी भाषिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. जुन्या बसस्थानक इमारतीवर मराठीत ‘निपाणी’ असे नाव ठळक अक्षरात लिहिले होते. मात्र, नवीन हायटेक बसस्थानक निर्मितीवेळी नागरिकांच्या आंदोलनानंतर कन्नड, इंग्रजीसोबत मराठी फलक लावण्यात आला होता. पण अलीकडच्या काळात तो फलक गायब झाला असून कन्नड व इंग्रजीतूनच नाव लिहिल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
शहरातील ८० टक्के नागरिक मराठी भाषिक असून, दररोज शेजारील महाराष्ट्रातील लिंगनूर, हमिदवाडा, चिखली, सेनापती कापशी, मेतके, मुरगूड येथील नागरिक निपाणीमध्ये खरेदी-विक्री व इतर कामासाठी ये-जा करतात. अशा वेळी बसस्थानकावर मराठी फलक न दिसणे हा मराठी भाषिकांचा अपमान असल्याचे मत नागरिकांतून व्यक्त होत आहे.पूर्वी सर्वपक्षीय नेत्यांच्या पुढाकाराने तिन्ही भाषांतील फलक लावण्यात आले होते. मात्र सध्या मराठी नाव गायब झाल्याने नागरिकांत संतापाची लाट आहे. निवडणुकीत मतांसाठी मराठी समाजाचा वापर करणाऱ्या नेत्यांनी या प्रश्नाकडे लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
——————————————————————-
कानडी फलकाचा आग्रह
अलीकडच्या काळात नगरपालिका प्रशासनाने शहरातील व्यवसायिकांना कन्नडमधील फलक लावण्याचा आग्रह धरला आहे. यामुळे मराठी व्यवसायिक अडचणीत सापडले असून नागरिकांचा गोंधळ वाढत आहे.नागरिकांनी आगारप्रमुख व नगरपालिकेकडे तातडीने लक्ष घालण्याची मागणी केली असून मराठी फलक पुन्हा बसविण्यात यावा, अशी जोरदार मागणी होत आहे.
——————————————————————–
‘शहर व परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणावर मराठी भाषिक आहेत. तरीही बसस्थानक व शहरातील व्यवसायिकांच्या ठिकाणी कन्नड फलक लावल्याने गोंधळ उडत आहे. बसस्थानकावर ‘निपाणी’ हा मराठी शब्द ठळक अक्षरात लिहावा आणि व्यवसायांच्या ठिकाणी मराठी फलक लावण्यास प्रोत्साहन द्यावे.’
-संजय साळुंखे, अभियंते, निपाणी.
Belgaum Varta Belgaum Varta