चिकोडी जिल्हा काँग्रेस : राज्यपालांना निवेदन
निपाणी (वार्ता) : कर्नाटकातील भाजपा सरकारचे मंत्री के. एस. ईश्वरप्पा यांचे राष्ट्रध्वज तिरंग्याच्या स्थानी भगवा ध्वज फडकाविण्याचे वक्तव्य भारतीय संविधानाचे आणि राष्ट्रध्वजाचा अवमान करणारे आहे. त्यांच्यावर तात्काळ राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी, या आशयाचे निवेदन निपाणी व बेडकिहाळ भाग काँग्रेसच्या वतीने राज्यपालांना तहसिलदारांच्या माध्यमातून सोमवारी सायंकाळी (ता.21) देण्यात आले.
माजी मंत्री वीरकुमार पाटील, माजी आमदार कासाहेब पाटील, माजी आमदार प्रा. सुभाष जोशी, चिकोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे यांच्या नेतृत्वाखाली तहसिलदार कार्यालयाला सदर निवेदन देण्यात आले.
निवेदनातील माहिती अशी, कर्नाटक राज्य सरकारचे मंत्री के. एस. ईश्वरपा यांनी तिरंगा ध्वजाच्या ठिकाणी भगवा ध्वज फडकाविण्याचे लोकहितविरोधी देशद्रोहाचे वक्तव्य केले आहे. तिरंगा ध्वज हा राष्ट्राच्या अखंडतेचा स्वातंत्र्याचा सार्वभौमत्वाचा आणि अस्मितेचा संविधानाचे संकेत देणारा आहे. त्याला विरोध करीत भगवा ध्वज फडकाविण्याचे ईश्वरप्पा यांचे विधान देशद्रोही स्वरूपाचे आहे. त्यांच्या विरुध्द देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून राष्ट्रध्वजाचा सन्मान करावा, या मागणीसाठी गेल्या अनेक दिवसापासून काँग्रेसच्या सदस्यांनी विधानसभा आणि विधानपरिषदेत धरणे सुरू केले आहे.
ईश्वरप्पा यांचे विधान हे संविधानाला धक्का पोहचविणारे आणि एका मंत्र्याला अशोभनिय आहे. त्यांची कर्नाटकातील मंत्री मंडळातून कमी करण्यात यावे. के. एस. ईश्वरप्पा यांच्यावर कारवाई व्हावी. अन्यथा चिकोडी जिल्हा काँग्रेस समिती यांच्यावतीने निपाणी आणि बेडकिहाळ भाग काँग्रेसतर्फे आंदोलन केले जाईल.
संविधानाच्या रक्षणाच्या कामाची पवित्र जबाबदारी आपणाकडे असून या संविधानाला धक्का पोहचविणार्या देशद्रोही वक्तव्याविषयी राज्यपालांनी गंभीर दखल घ्यावी. आपल्या अधिकाराचा वापर करून त्यांना मंत्रीमंडळातून कमी करावे. त्यांच्याविरुध्दचा खटला दाखल करावा असेही सदर निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
याप्रसंगी निपाणी भाग काँग्रेस अध्यक्ष राजेश कदम, युवा उद्योजक रोहन साळवे, पंकज पाटील, माजी नगराध्यक्ष विजय शेटके, विलास गाडीवड्डर, राजेंद्र चव्हाण, नगरसेवक संजय सांगावकर, संजय पावले, शेरू बडेघर, दिलिप पठाडे, दिपक सावंत, अनिस मुल्ला, माजी सभापती किरण कोकरे, धनाजी चव्हाण, अन्वर बागवान, भालचंद्र पारळे, किसन दावणे, अशोक लाखे, युवराज पोळ, रवि श्रीखंडे, सचिन हेगडे, अरुण आवळेकर, जीवन घस्ते, सुधाकर सोनाळकर, अशोक माने, सुनिल लाटकर यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.
सदर निवेदन स्विकारून वरिष्ठापर्यंत पोहचविण्याचे आश्वासन तहसिलदार कार्यालयातर्फे देण्यात आले.
Check Also
शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी अधिवेशनात आंदोलन
Spread the love राजू पोवार ; रयत संघटनेची गांधी भवनात बैठक निपाणी (वार्ता) : ओला …