
राजू पोवार ; कर्नाटकच्या निर्णयानंतर आनंदोत्सव
निपाणी (वार्ता) : यंदाच्या हंगामातील ऊसाला प्रति टन ३ हजार ५०० रुपये मागणी करून कर्नाटक राज्य रयत संघटनेने अनेक ठिकाणी आंदोलने केले. त्याला अनेक मठातील मठाधीश,विविध संघटनेने पाठिंबा दिला होता. त्यामुळे अखेर प्रशासनाला नमते घ्यावे लागले असून प्रति टन ३ हजार ३०० रुपये दर देण्याचे जाहीर केले आहे. त्याला आपली मान्यता असून उपपदार्थापासून मिळणाऱ्या रक्कमेमधील केंद्र आणि राज्य सरकारने प्रत्येकी प्रतिष्ठान १ एक हजार रुपये दिले पाहिजेत, या मागणीसाठी आपण हिवाळी अधिवेशनात रयत संघटनेतर्फे आवाज उठवणार असल्याचे मत कर्नाटक राज्य रयत संघटनेचे कार्याध्यक्ष राजू पोवार यांनी व्यक्त केले. राज्य सरकारने ३३०० रुपये दर जाहीर केल्याने संघटनेतर्फे आनंदोउत्सव साजरा करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
पोवार म्हणाले, गेल्या नऊ दिवसापासून ऊस दरासाठी कर्नाटक सीमा भागासह गुर्लापूरपर्यंत आंदोलन केली. त्यामध्ये शेतकरी, व्यापारी, विद्यार्थी, वकील संघटना, सामाजिक संघटना आणि इतर संघटनांनी सहभाग घेऊन पाठिंबा दर्शवला. त्यामुळेच या आंदोलनाला यश मिळाले आहे. या पुढील काळातही शेतकऱ्यावरील अन्यायाच्या विरोधात रयत संघटनेतर्फे रस्त्यावर उतरून आंदोलन केले जाईल. त्यालाही सर्वच स्तरातील नागरिकांचा पाठिंबा आवश्यक आहे. आता लवकरच केंद्र आणि राज्य सरकारकडून प्रति टन १ हजार रुपयाची मागणी संघटनेतर्फे केली जाणार आहे. ती मागणी मान्य न झाल्यास पुन्हा आंदोलन छेडण्याचा इशारा राजू पोवार यांनी दिला.
यावेळी सुनील पाटील, कलगोंडा कोटगे, सर्जेराव हेगडे, सिद्धगोंडा हिरीकुडे, सागर हावले, नितीन कानडे, महेश जनवाडे, सागर पाटील, सचिन कांबळे, आनंदा गायकवाड, बाबासाहेब पाटील, सुभाष खोत, सिद्धगोंडा मिरजे, विशाल मिरजे, बाबू माळी, एकनाथ सादळकर, प्रकाश नुले, बाबासाहेब पाटील, दयानंद पाटील, नामदेव साळुंखे यांच्यासह निपाणी व ग्रामीण भागातील रयत संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकरी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta