भटके कुत्रे आवरा : कुत्र्यांच्या झुंडींनी घेतला रस्ते व चौकांचा ताबा

निपाणी : गत महिन्यापासून शहरात मोकाट कुत्र्यांचा त्रास पुन्हा वाढला आहे. रस्त्यांवर, चौकांमध्ये व वसाहतींमधील कुत्र्यांच्या झुंडीनी नागरिकांना हैराण करून सोडले आहे. अनेकांना चावा घेतल्यामुळे जायबंदी व्हावे लागत आहे. तर रस्त्यावर अचानक वाहनासमोर कुत्रे आल्याने अपघातही झाले आहेत.
मोकाट कुत्र्यांना आवरण्यासाठी पालिका प्रयत्न करीत असले तरी फारसा फरक पडलेला नसल्याची स्थिती आहे. अनेक गल्लीमध्ये लहान मुलांना चावा घेण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे शहरवासीय भीतीच्या छायेखाली वावरत आहेत.
सद्या निपाणी शहरात मोकाट गुरे व मोकाट कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. दोन वर्षांपूर्वी कुत्र्याच्या चाव्यामुळे एका बालिकेचा बळी गेला होता. त्यावेळी या प्रश्नावर आंदोलनही करण्यात आले होते. त्यानंतर पालिकेने कुत्रे पकडण्याची मोहिम राबविली. परंतु संख्या काही कमी झाली नाही. कुत्र्यांची नसबंदी व अँटी रेबीज लसीकरणासाठी पालिकेला खर्च परवडणारा नसल्याचे सांगण्यात आले. शिवाय सामाजिक संस्थाही या कामासाठी पुढे येत नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे शहरातील भटक्या कुत्र्यांची संख्या कमी होत नसल्याची स्थिती आहे. येथील जत्राट वेसवरील एका बालकाला कुत्र्यांनी चावा घेतला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
तरीही अशा घटना कडे पालिकेचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे नाराजी व्यक्त होत आहे.
शहरातील असा एकही चौक किंवा रस्ता नाही तेथे कुत्र्यांच्या झुंडी दिसणार नाहीत. किमान आठ ते 12 च्या संख्येने कुत्रे एकत्रीत फिरतात. त्यामुळे रात्रीच्या वेळी पायी चालणे किवा दुचाकी चालविणे म्हणजे कसरतच करावी लागत आहे. कधी कुत्रे अंगावर धावून येतील याचा नेम नसतो असे चित्र आहे.
Belgaum Varta Belgaum Varta