
कापडी पिशव्या, लाकडाच्या वस्तू ; निपाणीत महिलांकडून खरेदी सुररु
निपाणी (वार्ता) : मकर संक्रांत एक दिवसावर आली आहे. त्यामुळे हळदी- कुंकू वाण देण्याच्या वस्तूंसाठी येथील बाजारात महिलांची वर्दळ दिसत आहे. केवळ हळदी- कुंकू आणि तीळगूळ देण्यापेक्षा यंदा परवडणाऱ्या उपयोगी आणि पर्यावरणपूरक वस्तू खरेदीकडे महिलांचा विशेष कल आहे.
बाजारात कमी खर्चात विविध पर्याय उपलब्ध आहेत. कापडी रुमाल, सुई-धाग्याचे किट, व्हेजिटेबल पाऊच, डबे, नाणी ठेवण्यासाठी कापडी किंवा गनी पर्स, यासारख्या वस्तूंची बाजारात चलती आहे.प्लास्टिक वस्तूंऐवजी निसर्गपूरक वस्तू ‘वाण’ देण्यावर अधिक भर दिसत आहे. पुनर्प्रक्रिया केलेल्या बाटल्या, कंटेनपासून बनवलेले प्लांटर्स, या सर्वाधिक मागणी असलेल्या वस्तू आहेत. तुळशीची छोटी रोपेही वाण म्हणून देण्याचा अलीकडे ट्रेंड आहे. बिया, माती, नारळाच्या काथ्यापासून बनवलेली छोटी भांडी असलेले स्प्राउट किटही भेटवस्तू म्हणून देऊ शकता. सध्या बाजारपेठांमध्ये मकरसंक्रांतीच्या सणासाठी आवश्यक वस्तू खरेदीसाठी महिला वर्गाची लगबग वाढली आहे.
——————————————————————-
पुनर्प्रक्रिया होणाऱ्या भेटवस्तूंना पसंती
बांगड्या, कंगवे, टिकल्या, हळदी-कुंकवाचे बॉक्स आदी वाण म्हणून देण्याची प्रथा आहे.अनेक गृहिणी आता रिसायकल (पुनर्प्रक्रिया) होणाऱ्या भेटवस्तू खरेदी करीत आहेत.
फॅब्रिकपासून बनवलेले डोअर हँगर्स, पुठ्यापासून बनविलेले हळदी-कुंकू बॉक्स, कामाला जाणाऱ्या महिला डबे ठेवण्यासाठी गनी बॅग अशा वस्तूंची मागणी महिला करत असल्याचे दुकानदारांनी सांगितले.
Belgaum Varta Belgaum Varta