
निपाणीत बंदीकडे दुर्लक्ष; कारवाई केवळ नावापुरतीच
निपाणी (वार्ता) : सरकारने प्लॅस्टिक बंदी लागू केली असली, तरी निपाणी शहरात मात्र या नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे चित्र आहे. परिसरातील मोकळे भूखंड, रस्ते, नाले आणि गटारीमध्ये प्लॅस्टिक पिशव्यांचे ढीग साचले असून नगरपालिकेची कारवाई केवळ नावापुरतीच असल्याचे आरोप नागरिक करत आहेत.
५१ मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिक पिशव्यांवर बंदी असतानाही किरकोळ दुकानदार, भाजी विक्रेते, फळ विक्रेते आणि फेरीवाले या पिशव्यांचा बिनधास्तपणे वापर करत आहेत. विशेष म्हणजे, परराज्यातून मोठ्या प्रमाणात या प्लॅस्टिक उत्पादनांची आवक निपाणी मध्ये होत आहे. या प्लॅस्टिकमुळे नाले व गटारी तुंबण्याचे प्रमाण वाढले असून पावसाळ्यात ही समस्या अधिक गंभीर रूप धारण करते. वर्षभरात नगरपालिका प्रशासनातर्फे ३१ ठिकाणी प्लास्टिक विरोधी पथकाने कारवाई केली असून संबंधितांकडून २६ हजार २०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. या प्लॅस्टिक प्रदूषणाचा फटका केवळ पर्यावरणालाच नव्हे तर मुक्या प्राण्यांनाही बसत आहे. रस्त्यावरील कचऱ्याच्या ढिगाऱ्यात पडलेले खाद्यपदार्थ प्लॅस्टिकसह खाल्ल्याने अनेक मोकाट जनावरांना मृत्यूला सामोरे जावे लागत आहे.पालिका प्रशासनाने याप्रश्नी कठोर दंडात्मक कारवाई करण्यासह जनजागृती मोहीम अधिक प्रभावीपणे राबवावी, अशी मागणी पर्यावरणप्रेमींकडून होत जात आहे.
——————————————————————-
‘नगरपालिकेकडून प्लास्टिक विरोधी पथके नेमण्यात आली आहेत. प्लॅस्टिक वापर करणाऱ्यावर कारवाई करून दंड आकारण्यात येत आहे. प्लॅस्टिक बंदीसह कापडी पिशव्या वापरण्यासाठी जनजागृती, प्रबोधन केले जात आहे.’
–विनायक जाधव, अभियंते,आरोग्य विभाग, निपाणी.
——————————————————————–
‘व्यावसायिकांनी प्लास्टिक पिशवीचा वापर टाळावा व नागरिकांनी सुद्धा घेण्यासाठी कापडी पिशवीचा वापर करावा. ‘स्वच्छ व सुंदर निपाणी’साठी नागरिकांचे योगदानही खूप महत्त्वाचे आहे. ‘
–फिरोज चाऊस, पर्यावरणप्रेमी, निपाणी.
Belgaum Varta Belgaum Varta