ऊस पिकावर ड्रोनद्वारे औषध फवारणीच्या प्रात्यक्षिकास शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
कोगनोळी : ऊसाच्या उत्पादनवाढीसाठी शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करून देणार आहे. शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाहू साखर कारखाना कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी केले.
सीमाभागातील कोगनोळी सेंटरकडील शेतकऱ्यांसाठी आप्पाचीवाडी तालुका निपाणी येथे शाहू साखर कारखान्यामार्फत मंजूनाथ दिवटे यांच्या ऊस पिकावर ड्रोनद्वारे औषध फवारणीच्या प्रात्यक्षिकवेळी ते बोलत होते.
स्वागत शाहूचे ज्येष्ठ संचालक व कर्नाटक राज्याचे माजी ऊर्जा राज्यमंत्री वीरकुमार पाटील यांनी केले.
प्रास्तविक ऊस विकास अधिकारी के. बी. पाटील यांनी केले.
या प्रात्यक्षिकास शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शाहूमार्फत एकरी सहाशे पन्नास इतक्य माफक दरात ही सुविधा उपल्बध करून देणार असून सोमवार पासून त्यासाठी नोंदणी सुरू करण्यात येणार आहे, अशी घोषणा यावेळी समरजितसिंह घाटगे यांनी केली.
यावेळी राजे समरजितसिंह घाटगे यांना साखर उद्योग गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल व शेतकऱ्यांसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करून दिल्याबद्दल सीमाभागातील शेतकऱ्यांच्यावतीने सत्कार केला.
घाटगे पुढे म्हणाले, शाहूचे संस्थापक स्वर्गीय राजे विक्रमसिंह घाटगे यांनी कारखान्यामार्फत ऊसाचे जादा उत्पादन घेण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधावर पोचविण्याची परंपरा निर्माण केली आहे. तीच पुढे चालविताना शेतकऱ्यांसाठी ऊस उत्पादन वाढीसाठी सातत्याने नवनवीन प्रयोग राबवित आहोत. ड्रोन तंत्राद्वारे विद्राव्य खते, औषधे, कीटकनाशके यांची फवारणी उपयुक्त ठरत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ड्रोनद्वारे खत फवारणी तंत्रास प्रोत्साहन दिले आहे. “शाहू”च्या शेतकऱ्यांना ही सुविधा उपलब्ध करून देणार आहे. तसेच सीएनजी चलित ट्रॅक्टरसाठीसुद्धा प्रोत्साहन देण्याचे धोरण राहील. शाहू साखर कारखाना व कृषि संघाप्रमाणे सीमाभागातील शेतकऱ्यांच्या सोयीसाठी राजे बँकही मल्टीस्टेट करून सेवा पुरविणार आहे. अशी घोषणाही घाटगे यांनी केली.
यावेळी शाहूचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे, कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण राजे, बँकेचे चेअरमन एम. पी. पाटील, बेळगाव जिल्हा पंचायतीचे माजी उपाध्यक्ष पंकज पाटील, भागातील विविध संस्थाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सभासद, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संचालक युवराज पाटील यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta