
बागेवाडी; महाविद्यालयात राष्ट्रीय पातळीवरील परिषद
निपाणी (वार्ता) : विकसित भारत हा केवळ आर्थिक वाढीचा घटक नसून तो सामाजिक, सांस्कृतिक आणि मानवी मूल्यांचा एक व्यापक प्रकार आहे. भारत हा जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक आहे. उत्पादन क्षेत्र, शेती, सेवा आणि डिजिटल अर्थव्यवस्थेच्या विकासासह २०४७ पर्यंत शक्तिशाली देश बनू शकतो. ‘स्वावलंबित भारत’ मोहीम देशांतर्गत उत्पादन आणि उद्योजकतेला चालना देईल, असे मत बेळगाव येथील डॉ. बी.जी. पाटील यांनी व्यक्त केले.
बेळगाव केएलई संस्थेच्या येथील जी. आय. बागेवाडी कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाने मंगळवारी (ता.२४ ) आयक्यूएसी-प्रेरित कला विभागांच्या सहकार्याने “विकसित भारत २०४७: प्रगती, नवोन्मेष आणि समानतेसाठी धोरणे” या शीर्षकाखाली आयोजित राष्ट्रीय स्तरावरील परिषदेत ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
डॉ. पाटील म्हणाले, महिला सक्षमीकरण, ग्रामीण विकास, मागासवर्गीयांचे सक्षमीकरण आणि शिक्षणात समान संधी याद्वारे समान भारताची निर्मिती करता येते. आर्थिक प्रगतीसोबतच सामाजिक न्याय देखील खूप महत्त्वाचा आहे. युवक हे राष्ट्राचे भविष्य असून कौशल्यावर आधारित शिक्षण आणि नैतिक मूल्यांचा विकास आवश्यक आहे. नवीन तंत्रज्ञानाची जाणीव आणि संशोधनाची भावना देशाला जगाच्या आघाडीवर घेऊन जाईल. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), डिजिटल शिक्षण, सायबर सुरक्षा आणि संशोधन क्षेत्रे देशाचे भविष्य घडवतील. तरुणांनी नवीन नवोपक्रमांद्वारे राष्ट्राच्या विकासात हातभार लावण्याचे आवाहन त्यांनी केले.
निवृत्त प्राचार्य डॉ. एम.बी. कोथळी यांनी रोपट्याला पाणी घालून कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. विविध राज्यांतील १०० हून अधिक प्राध्यापक आणि संशोधन विद्यार्थ्यांनी दोन परिषदांमध्ये त्यांचे संशोधन पत्र सादर केले. प्रकाशनासाठी निवडलेल्या १६० संशोधन पत्रांच्या ३ पुस्तकांचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. प्राचार्य डॉ. एम. एम. हुरळी यांनी,सामाजिक समता आणि मानवी मूल्यांचे पालन केल्याशिवाय खरा विकास शक्य नसल्याचे सांगितले.
सेवानिवृत्त प्राचार्य डॉ. बी.एस.कांबळे, प्रा.व्ही. बी. धारवाड, डॉ. एस .बी.सोलाबन्नवर, डॉ. एम. एम.शंरकोप्प डॉ. आर. जी. खराबे, प्राचार्या हेमा चिक्कमठ, डॉ. एस. एम. रायमाने, शंकरमूर्ती के.एन., डॉ. विनोद मगदुम्, नागराज बेळगावकर, संतोष घोरपडे, पूजा खानाप्पागोळ, प्रा. शशिधर कुंभर, प्रा. सिद्धू उदागट्टी यांच्यासह विविध राज्यातून आलेले १२० हून अधिक प्राध्यापक व संशोधन विद्यार्थी उपस्थित होते. समन्वयक बी. जी. उळेगड्डी यांनी स्वागत केले. डॉ. ए. व्ही. केंचक्कनवरा यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. प्रा. नमिता नाईक आणि आर. मोनीका यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. अतुलकुमार कांबळे यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta