Monday , September 21 2026
Breaking News

धारवाडमध्ये सरकारी भरतीसाठी विद्यार्थ्यांचे भव्य आंदोलन; हजारोंचा सहभाग

Spread the love

 

बंगळूर : राज्य सरकारच्या विविध विभागांतील रिक्त पदे तातडीने भरावीत, या मागणीसाठी धारवाडमध्ये हजारो विद्यार्थ्यांनी भव्य मोर्चा काढत आंदोलन केले. श्रीनगर परिसरातून सुरू झालेल्या या रॅलीत मोठ्या संख्येने नोकरीसाठी इच्छुक युवक-युवती सहभागी झाले.

विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला अधिकृत परवानगी नव्हती. तरीही सकाळपासूनच मोठ्या संख्येने स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे उमेदवार एकत्र जमले. आंदोलनाला विरोधी पक्षनेते आर. अशोक, चलवादी नारायणस्वामी तसेच आमदार अरविंद बेल्लद यांसह भाजपचे अनेक नेते उपस्थित होते.

आंदोलनकर्त्यांनी विविध विभागांतील रिक्त पदे तातडीने भरावीत तसेच नोकरीसाठीची वयोमर्यादा वाढवावी, अशी मागणी केली. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांना मोठी कसरत करावी लागली. काही ठिकाणी आंदोलनकर्ते आणि पोलिसांमध्ये शाब्दिक चकमकही झाली.

दरम्यान, नोकरी इच्छुक विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष कांतिकुमार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांना ऑटोमध्ये बसवून नेण्यात येत असताना विद्यार्थ्यांनी वाहनाला घेराव घालत संताप व्यक्त केला.

या वेळी माध्यमांशी बोलताना विरोधी पक्षनेते आर. अशोक यांनी काँग्रेस सरकारवर टीका केली. “गेल्या तीन वर्षांत पात्र उमेदवारांसाठी एकही मोठी भरती प्रक्रिया राबवण्यात आलेली नाही. राज्यात सुमारे २.८५ लाख पदे रिक्त आहेत. वित्त विभागानेही मान्यता दिली आहे, मात्र सरकारकडे वेतनासाठी निधी नसल्यामुळे भरती होत नाही,” असा आरोप त्यांनी केला.

मुख्यमंत्री टप्प्याटप्प्याने भरती करू असे सांगतात, तर उपमुख्यमंत्री आंदोलनाला राजकीय प्रेरित म्हणतात, असा टोला लगावत त्यांनी तातडीने भरती प्रक्रिया सुरू करण्याची मागणी केली. अन्यथा राज्यभर आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

About Belgaum Varta

Check Also

गृहलक्ष्मीच्या दोन हजारांसाठी महिलांची धावपळ!

Spread the love    सणासुदीच्या तोंडावर हप्त्याची प्रतीक्षा; पडताळणीच्या कचाट्यात पात्र लाभार्थीही अडकल्या बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *