बोरगावमध्ये महिला दिनानिमित्त व्याख्यान
निपाणी (वार्ता) : समाजाच्या प्रगतीमध्ये महिलांचे मोठे योगदान आहे. त्यांच्याशिवाय जीवन अपूर्ण आहे. आई, बहीण, पत्नीच्या रूपामध्ये ती घरातील प्रत्येकासाठी काम करून कुटुंबासह समाज घडविण्याचे काम तिच्या हातून होत असल्याचे मत डॉ. रागिणी पाटील यांनी व्यक्त केले. येथील बोरगाव शिक्षण संघाच्या के. एस पाटील माध्यमिक शाळा व हंसवाहिनी महिला मंडळाच्या संयुक्त विद्यमानाने महिला दिनानिमित्त आयोजित व्याख्यानात पाटील बोलत होत्या. अध्यक्षस्थानी महिला मंडळाचे अध्यक्षा वंदना पाटील होत्या.
पाटील म्हणाल्या, शिक्षण, विज्ञान, क्रीडा, राजकारण, उद्योग, सहकार अशा विविध क्षेत्रांमध्ये महिला कार्यरत झाल्या आहेत. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून त्या समाजाच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. त्यामुळे त्यांचा सन्मान आणि हक्कांचे संरक्षण करणे हे समाजाचे कर्तव्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
प्रारंभी व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले.
वंदना पाटील यांनी, कुटुंब व्यवस्थेत महिला प्रमुख असल्याने त्यांच्या सन्मानासाठी दरवर्षी महिला दिन कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे. त्यामध्ये विविध उपक्रम हाती घेऊन महिलांना व्यासपीठ निर्माण केले जात असल्याचे सांगितले. कार्यक्रमास बोरगाव शिक्षण संघाचे अध्यक्ष राजेंद्र पाटील, महिला संघाच्या उपाध्यक्ष मेधा पाटील, सुजाता लगारे इंदुमती हिरेमठ, शुभदा पाटील, नगरसेविका शोभा हवले, विलास अम्मन्नावर, एस. टी. लगारे, सुलोचना हवले यांच्यासह महिला मंडळाच्या पदाधिकारी, शिक्षिका, शिक्षक व महिला उपस्थित होत्या.
Belgaum Varta Belgaum Varta