
निपाणी (वार्ता) : नवीन ट्रॅक्टरला रोटर जोडून नवीन ट्रॅक्टर कारदगाहून गळतगाकडे घेऊन जात असताना चालकाचा ताबा सुटून झालेल्या अपघातात ट्रॅक्टरखाली सापडून चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (ता.२१) सायंकाळी सहा वाजता सुमारास घडली. सुधाकर रावसाहेब कोंडेकर (वय ३८) असे जागीच ठार झालेल्या चालकाचे नाव आहे. तर संजय अण्णाप्पा चौगुले वय ३७ (रा. गळतगा) हे गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना कारदगा -भोज मार्गावरील वळणावर घडली. या अपघाताची नोंद सदलगा पोलीस ठाण्यात झाली आहे.
रस्त्याच्या दुतर्फा रस्ता अरुंद व दोन्ही बाजूंनी खंदक असल्याने निष्पाप युवकाचा बळी गेला आहे. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की, गळतगा येथील सुधाकर कोंडेकर व संजय चौगुले हे दोघेजण एमआयडीसी येथे नवीन आणलेल्या ट्रॅक्टरला रोटर जोडणीसाठी घेवुन गेले होते. सांयकाळी रोटरी बसवून परत कारदगामार्गे गळतगाकडे येत असताना पूलाच्या पुढे असलेल्या वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने ट्रॅक्टर खाली पाच ते सहा फूट चरीत पलटी झाला. ट्रॅक्टर खाली सापडून सुधाकर कोंडेकर यांचा जागीच मृत्यू झाला तर संजय चौगुले हे गंभीर जखमी झाले आहेत.
घटनेची माहिती समजतात घटनास्थळी नागरिकांची गर्दी झाली होती. यावेळी तात्काळ जखमी व मयत सुधाकर यास बाहेर काढले. तर जखमी संजय चौगुले यांना पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले. मयत सुधाकर यांच्या मागे पत्नी, आई, वडील, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. शेतकरी युवकाचा असा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. घटनास्थळी उपनिरीक्षक शिवकुमार बिराजदार, हवालदार विजयकुमार कुरबर यांनी भेट देवून पंचनामा केला.
Belgaum Varta Belgaum Varta