Sunday , April 5 2026
Breaking News

शेतकऱ्यांच्या विकासासाठी इथेनॉल निर्मितीला चालना द्यावी

Spread the love

 

रयत संघटनेचे कार्याध्यक्ष राजू पोवार ; इथेनॉल संघर्षमय लढा पुस्तकाचे प्रकाशन

निपाणी (वार्ता) : शेतकऱ्यांना ऊस उत्पादनापासून अपेक्षित दरासाठी प्रतिवर्षी आंदोलने करावी लागत आहेत. शेतकऱ्यांच्या विकासासाठी शासनाने ठोस धोरण राबविणे गरजेचे आहे. त्यासाठी केंद्र शासनाने अधिक इथेनॉल निर्मितीला चालना देऊन शेतकऱ्यांचा आर्थिकदृष्ट्या विकास साधण्यासाठी पाऊल उचलणे आवश्यक आहे. अन्नदाता शेतकऱ्यांचा विकास झाल्यास देशाचा विकास शक्य आहे. इथेनॉल उत्पादन हे शेतकऱ्यांना फायदेशीर असल्याचे प्रतिपादन कर्नाटक राज्य रयत शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष राजू पोवार यांनी केले.
चिक्कोडी येथील लक्ष्मीलिला वृद्धाश्रमात सेनापती कापशी येथील जैव इंधन शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शामराव देसाई यांच्या यशस्वी इथेनॉलचा संघर्षमय लढा पुस्तक प्रकाशन आणि गौरव समारंभ कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी रयत शेतकरी संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष राजू पोवार तर प्रमुख पाहुणे म्हणून बेळगाव जिल्हा रुग्णालयाचे निवृत्त डॉ. विठ्ठल शिंदे, कर्नाटक सरकारी व निमसरकारी नोकर संघाचे राज्य अध्यक्ष डॉ. विश्वनाथ धुमाळ, चिक्कोडी जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालयातील विषय तज्ञ एच. एस. खाडे, चिक्कोडी तालुका शिक्षक संघाचे अध्यक्ष जी. एम. कांबळे, निवृत्त प्राचार्य एम. आर. ढेकळे, महिला आघाडी अध्यक्षा सुजाता देसाई, मुख्याध्यापक आर. पी. बामणे उपस्थित होते.
जैव इंधन शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शामराव देसाई म्हणाले, देशामध्ये उत्पादित होणाऱ्या अतिरिक्त उसापासून साखर निर्मिती न करता थेट इथेनॉल निर्मिती झाल्यास शेतकऱ्यांना प्रतिटन किमान ४५०९ रुपये दर देणे शक्य आहे. त्यासाठी आपण राज्य आणि केंद्र शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा केला असून पुस्तिकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा इथेनॉल निर्मितीतून शेतकऱ्यांच्या विकासाचा आढावा घेतला आहे. इथेनॉल निर्मितीबाबत शासनाने ठोस धोरण जाहीर केल्यास शेतकऱ्यांचा आर्थिकदृष्ट्या विकास होणार असल्याचे सांगितले.
सब्जेक्ट इन्स्पेक्टर एच. एस. खाडे यांनी देशात शेतकऱ्यांच्या विकासासाठी पर्यायी इंधन उत्पादन अवलंबणे अत्यावश्यक असल्याचे सांगितले. जी. एम. कांबळे यांनी देशातील अधिक जनता शेतीवर अवलंबून असून शेतकऱ्यांचा विकास झाल्यास सामाजिक विकासाला बळ मिळेल, असे सांगितले. डॉ. विश्वनाथ धुमाळ यांनी शेतकऱ्यांच्या विकासासाठी अतिरिक्त उसापासून इथेनॉल निर्मिती उत्तम पर्याय असून त्यामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक विकास शक्य असल्याचे सांगितले. निवृत्त प्राचार्य एम. आर. ढेकळे यांनी कवितेच्या माध्यमातून समाजहिताचे चित्रण सादर करून कृषीप्रधान भारत देशात शेतकऱ्यांच्या विकासासाठी इथेनॉल निर्मिती उत्तम पर्याय असल्याचे सांगितले. सुजाता देसाई यांनी ऊस पिकासह अन्य पिकांपासून थेट इथेनॉल निर्मितीसाठी राज्य आणि केंद्र शासनाकडे केलेल्या पाठपुराव्याची माहिती दिली. डॉ. विठ्ठल शिंदे यांनी शेतकऱ्यांच्या विकासासाठी समाजातील सर्वांचे प्रयत्न आणि सहकार्य आवश्यक असल्याचे सांगितले.
प्रारंभी मुख्याध्यापक आर. पी. बामणे यांनी स्वागत तर प्रा. विठ्ठल नाईक यांनी प्रास्ताविक केले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुस्तक प्रकाशन सोहळा आणि देसाई दाम्पत्याचा गौरव समारंभ पार पडला. रयत शेतकरी संघटनेकडूनही देसाई दाम्पत्याचा सन्मान करण्यात आला. राजू पोवार यांनी वृद्धाश्रमाला ५ हजार रुपयांची देणगी दिली.
कार्यक्रमास चिंचणीचे माजी ग्रामपंचायत अध्यक्ष रावसाहेब देवरमणी, नसरूद्धीन नाईकवडी, पांडुरंग आरेकर, प्रवीण हेळवाडे, लिला केणे, लक्ष्मी केणे यांच्यासह मान्यवर व वृद्धाश्रमातील नागरिक उपस्थित होते. वृद्धाश्रमाचे संस्थापक अंकुश केणे यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

सिद्धार्थ ढोणे महाराजांच्या भाकणूकीने बेनाडी बिरदेव यात्रेची उत्साहात सांगता

Spread the love  निपाणी (वार्ता) : बेनाडी येथे बिरदेव देवस्थान कमिटीतर्फे आयोजित बिरदेव यात्रेची सांगता …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *