
नाश्ता सेंटरना टाळे लावण्याची वेळ; व्यावसायिक गॅस झाले दुरापास्त
निपाणी (वार्ता) : निपाणी शहरातील हॉटेल व्यवसायाला व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या टंचाईचा सामना करावा लागत आहे. शहरात २०० छोटे-मोठे हॉटेल असून, सिलिंडर मिळत नसल्याने व्यावसायिकांनी आता ‘मेनू’मध्ये कपात करण्यासोबतच पर्यायी इंधन म्हणून इंडक्शन, इलेक्ट्रिक शेगडी, कोळशावर आपले काम भागवत आहेत. पण त्यांचेही दर वाढल्याने हॉटेल चालक ‘गॅसवर’ असून नाश्ता सेंटरना टाळे लावण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.
व्यावसायिक सिलिंडरची उपलब्धता नसल्यामुळे हॉटेल चालकांनी जे पदार्थ तयार करण्यासाठी जास्त वेळ आणि गॅस लागतो, असे पदार्थ मेनूमधून कमी करत आहेत. त्यात डोसा, इडली, उत्तापा अशा पदार्थांचा समावेश आहे. शिवाय उपलब्ध जास्त साठा जास्त काळ टिकून ठेवण्यासाठी ग्राहकांना मोजकेच पण लवकर तयार होणारे पदार्थ दिले जात आहेत. एकीकडे अधिकृत पुरवठा कमी झाला असताना, दुसरीकडे ज्यांना सिलिंडर मिळत आहे, त्यांना तो चढ्या दराने घ्यावा लागत आहे. ठरावीक ठिकाणीच सिलिंडर उपलब्ध करून दिले जात असल्याने छोट्या व्यावसायिकांची कोंडी होत आहे.
——————————————————————
पर्यायी इंधनांचा वापर वाढला
गॅस मिळत नसल्याने अनेक हॉटेल चालकांनी आता जुन्या पद्धतीच्या कोळशाच्या शेगड्या किंवा इलेक्ट्रिकल इंडक्शन, चुलीचा वापर वाढवला आहे. पण यामुळे खर्चात वाढ होत असून चवीवरही परिणाम होत असल्याचे काहींचे म्हणणे आहे.
——————————————————————–
‘व्यावसायिक सिलिंडरचा पुरवठा बंद असून तो सुरळीत करून वितरणातील पारदर्शकता तपासावी. गॅसअभावी व्यवसाय बंद ठेवण्याची वेळ येऊ नये. प्रशासनाने ग्राहकांच्या सोयीसाठी सिलिंडर उपलब्ध करून द्यावे, ही विनंती.’
-जय सांगावकर,
हॉटेल व्यवसायिक, निपाणी.
——————————————————————–
‘व्यावसायिक सिलिंडरअभावी काहींनी पर्यायी व्यवस्था करूनही तो खर्चिक आहे. व्यवसाय टिकविण्यासाठी हॉटेल, चालकांनी मेनू कार्डमधून अनेक पदार्थ वगळले आहेत. काही छोटे हॉटेल, बंद ठेवण्याची वेळ आली असून तातडीने पर्याय काढावा.’
-संदीप खडके,
नाष्टा सेंटर चालक, निपाणी.
—————————————————————-
* शहरात लहान मोठे २०० हॉटेल व्यवसायिक
* व्यवसायावर ५०० पेक्षा अधिक आचारी, कामगार
* गॅस तुटवड्यामुळे उलाढालीवर परिणाम
* ज्यादा गॅस आणि तेल लागणारे पदार्थ गायब
Belgaum Varta Belgaum Varta