निपाणी (वार्ता) : जागतिक वन दिनानिमित्त भूमी वात्सल्य सोशल फाउंडेशनतर्फे यरनाळ येथील गायरान परिसरात वृक्षारोपणाचा प्रेरणादायी उपक्रम पार पडला. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत भारतीय वंशाच्या विविध वृक्षांची लागवड यावेळी करण्यात आली करण्यात आली.
सुरेश घाटगे यांनी स्वागत करून पर्यावरणाचे महत्त्व स्पष्ट केले. या उपक्रमांतर्गत वड, पिंपळ, महोगणी, उंबर, करंजी यांसारख्या पर्यावरणासाठी उपयुक्त आणि जैवविविधतेला पोषक अशा वृक्षांची लागवड करण्यात आली. स्थानिक स्वयंसेवक व पर्यावरणप्रेमी नागरिकांच्या सक्रिय सहभागामुळे हा उपक्रम यशस्वी झाला. भूमी वात्सल्य सोशल फाउंडेशनचे संस्थापक नामदेव चौगुले यांनी, वन हे पृथ्वीचे फुफ्फुस आहेत. झाडे केवळ सावली देत नसून ती आपल्याला जीवन देतात. आजच्या विकासाच्या युगात आपण निसर्गापासून दूर जात आहोत, ही चिंतेची बाब आहे. त्यामुळे प्रत्येकाने किमान एक तरी झाड लावून त्याचे संगोपन करणे ही काळाची गरज आहे.भूमी वात्सल्य सोशल फाउंडेशनचा उद्देश फक्त वृक्षारोपणापुरता मर्यादित नाही. त्या रोपांचे संगोपन, संवर्धन आणि पर्यावरणाबद्दल जनजागृती करणे हा आहे. आज लावलेले हे रोप उद्याचा श्वास बनणार आहे. ‘एक झाड, एक जीवन’ ही संकल्पना प्रत्येकाने आत्मसात करण्याचे आवाहन केले.
सर्वांनी मिळून रोपे लावून त्यांचे संगोपन करण्याचा संकल्प केला. शिवाय पर्यावरण रक्षणाची शपथ घेतली.
यावेळी कृष्णात बुरटे, गजानन चव्हाण, अशोक इंजल, सुरेश घाटगे, राजू डोंगळे, सुनील पाटील, उमेश डावरे, आप्पासो माळी, प्रवीण पाटील, संतोष पाटील, विलास गुरव, अपूर्वा चौगुले यांच्यासह पर्यावरणप्रेमी नागरिक उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta