Monday , May 25 2026
Breaking News

पावसाळ्यापूर्वीच मांगुर फाट्यावरील पिल्लर उभारणी

Spread the love

 

पश्चिमेकडून वाहतूकीचा मार्ग मोकळा : वेदगंगा नदीकाठाला यंदा दिलासा
निपाणी (वार्ता) : पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गाचे सहा पदरीकरणाचे काम सुरू आहे. मांगुर फाट्यानजीक वेदगंगा नदीवरील पुल हा सीमाभागातील शेतकऱ्यांसह नागरिकांच्या लढ्यामुळे भरावाऐवजी पिल्लरचा होत आहे. सध्या हे काम युद्धपातळीवर सुरू असून पावसाची साथ मिळाल्यास येत्या पावसाळ्यापूर्वी पश्चिमेकडील बाजूची पिल्लर उभारणीचे काम पूर्ण होऊन या बाजूने वाहतूकही सुरू होईल, असे अभिवचन ठेकेदार औताडे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी वेदगंगा नदीकाठ बचाव कृती समितीला दिले. कृती समितीच्या सदस्यांनी कामाच्या ठिकाणी पाहणी केली.
वेदगंगा नदीपासून उत्तरेला एक हजार फुट (३००मीटर) पिल्लर उभारुन पूल बांधण्याचा आदेश राष्ट्रीय राजमार्ग मंत्रालयाने दिला आहे. यासाठी सुमारे ७० कोटी रुपयाच्या जादा निधीचीही तरतूद केली आहे. हा राष्ट्रीय महामार्ग बनविताना घातलेल्या भरावानंतर आता पुन्हा सुमारे १० ते १२ फुटापर्यत भराव करण्यात येणार होता. त्यामुळे पुराच्या पाण्याच्या विसर्गाला अडथळा निर्माण होवून महामार्गाच्या पश्चिमेकडील नदीकाठावरील सुमारे २० गावातील शेतीसह गावे जलमय होण्याची शक्यता होती. त्यामुळे सहकारत्न उत्तम पाटील यांच्या नेतृत्वाखाली सीमाभागातील शेतकऱ्यांनी माजी कृषीमंत्री शरद पवार यांच्या माध्यमातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची दिल्ली येथे भेट घेतली. त्यामुळे हा प्रश्न मार्गी लागला आहे. सध्या आधुनिक मशनरीद्वारे पश्चिम बाजूच्या पिल्लर उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. एका बाजूला १३ पिल्लर असून एकूण ५२ पिल्लर निर्माण करण्यात येणार आहेत. पिल्लर उभे झाल्यावर येथील भराव हटविला जाणार असल्याचे राजवर्धन पाटील यांनी दिली. यावेळी के. डी. पाटील, शेखर सावंत, शिवाजी पाटील-बानगे, अजित पाटील, नानासाहेब पाटील, अमोल पाटील, शिवाजी पाटील, विनायक लोहार, सुदीप वाळके, दिपक पाटील यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
——————————————————————–
दोन्ही बाजूला दिशादर्शक फलक लावा
पुलाचे काम सुरू असल्याने वाहतूक वळवली आहे. या दरम्यान गत चार दिवसात म्हाकवे येथील युवकाचा अपघात होवून जीव गेला होता. त्यामुळे दोन्ही बाजूला दिशादर्शक फलक तसेच रिफ्लेक्टर लावावेत अशा सुचनाही कृती समितीने ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

About Belgaum Varta

Check Also

आप्पाचीवाडी पुलासाठी आरपारची लढाई; रयत संघटनेचे कार्याध्यक्ष राजू पोवार

Spread the love  २८ रोजी पाटबंधारेसह तालुका पंचायत कार्यालयाला टाळे ठोकणार निपाणी (वार्ता) : आप्पाचीवाडी, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *