शहरात भगवे ध्वज, पताकांची सजावट; शोभायात्रेची तयारी पूर्ण
निपाणी (वार्ता) : चैत्र महिन्याच्या आगमनाने निपाणी नगरीत भक्तीचा सुगंध दरवळू लागला आहे. रामनवमी उत्सवाला प्रारंभ झाला आहे. येथील राम मंदिरासह श्रीराम सेना हिंदुस्तानतर्फे कार्यक्रमाची रेलचेल सुरू आहे. रामनवमीनिमित्त येथील धर्मवीर संभाजीराजे चौकासह शहरात विविध ठिकाणी भगव्या पताका लावून सजावट करण्यात आली आहे. त्यामुळे शहराला भगवेमय स्वरूप प्राप्त झाले आहे. शिवाय सर्वत्र चैतन्याचे वातावरण पसरले आहे.
रामनवमी सोहळा आणि शोभा यात्रेमुळे शहर पुन्हा एकदा राममय होणार आहे. श्रीराम मंदिरावरील आकर्षक विद्युत रोषणाई, सजलेले रस्ते आणि उत्सुक भाविकांची लगबग यामुळे संपूर्ण वातावरणात एक वेगळीच प्रसन्नता निर्माण झाली आहे. श्रीराम सेना हिंदुस्तानतर्फे सोहळा काळात हनुमान चालीसा पठणसह प्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. शिवाय पारंपारिक वेशात दिवसाची रॅली काढण्यात आली. बुधवारी (ता.२५) घरोघरी रामनवमी कार्यक्रमाबाबत प्रचार करण्यात येणार आहे. गुरुवारी (ता.२६) राम जन्मोत्सव आणि रामनवमी साजरी करण्यात येणार आहे. त्याचीही तयारी पूर्णत्वाकडे आली आहे. त्यादिवशी येथील राम मंदिरात आकर्षक फुलांची सजावट केली जाणार आहे. दुपारी तीन वाजता शहरातील प्रमुख मार्गावरून शोभायात्रा काढण्यात येणार आहे. त्यामुळे ‘जय श्रीराम’च्या गजरात वातावरण दुमदुमून जाणार आहे. शोभायात्रा यशस्वी करण्यासाठी संदीप मोहिते, श्रेयश आंबले, अनिल भिलुगडे, विनायक शेटके, योगेश कोठीवाले, आकाश चव्हाण, जिगनू मोडीकर, सुरज काशीदकर यांच्यासह पदाधिकारी परिश्रम घेत आहेत.
——————————————————————–
सोहळा अविस्मरणीय ठरणार
परंपरेचा वारसा, भक्तीचा आविष्कार आणि एकात्मतेचा उत्सव, अशा त्रिवेणी संगमाने निपाणी नगरीत रामनवमीचा सोहळा आणि शोभायात्रा यंदाही अविस्मरणीय ठरणार असल्याचे श्रीराम सेना हिंदुस्तानचे चिक्कोडी जिल्हा अध्यक्ष ॲड. निलेश हत्ती यांनी सांगितले.
Belgaum Varta Belgaum Varta