
निपाणी (वार्ता) : मूळ राहणार सैनिक टाकळी (ता. हातकणंगले) आणि सध्या राहणार निराळे गल्ली येथील अभिषेक शिवानंद दत्तवाडे या युवकाच्या खून प्रकरणात सहभागी अल्पवयीन संशयित स्वत:हून पोलिसांत हजर झाला होता. दरम्यान मंगळवारी (ता.5) पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी चालविण्याचे वृत्त सूत्रांकडून समजते. तरीही बुधवारी (ता.6) सायंकाळी निपाणीच्या मंडल पोलीस निरीक्षकांशी याबाबत संपर्क साधला असता त्यांनी अद्याप तपास सुरू आहे असे सांगून कानावर हात ठेवले आहेत. त्यामुळे या खून प्रकरणाचे गौड बंगाल वाढत चालले आहे.
प्राथमिक अंदाजानुसार दुचाकी विक्रीच्या व्यवहारातून हा खून झाल्याची चर्चा निपाणी शहरात सुरू झाली आहे. अभिषेक हा मूळचा सैनिक टाकळी येथील रहिवासी असून तो येथील एका चित्रपटगृहात कामावर आहे. तो आईसह येथील मानवी गल्लीत एका अपार्टमेंटमध्ये भाडोत्री राहत होता. रविवारी (ता.3) रात्री साडेबाराच्या सुमारास तो काम आटोपून येत असताना अभिषेकवर तिघांकडून चाकू हल्ला झाला होता. यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला होता. या खुनासाठी संबंधित आरोपींनी यमगरणी परिसरात महामार्गावर थांबून हत्यारांची विक्री करणार्यांकडून सदरची हत्यारे खरेदी केल्याचेही विश्वसनीय वृत्त आहे. संबंधित आरोपींनी खुनाचा गुन्हा कबूल केला असला तरीही माहिती देण्यास पोलिसांनी मात्र नकार दिला आहे. त्यामुळे या प्रकरणाचे गूढ दिवसेंदिवस वाढत चालले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta