
कोगनोळी : हणबरवाडी (तालुका निपाणी) येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचा 21 वा वर्धापन दिन भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. त्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
बुधवार तारीख 6 रोजी सकाळी 8 वाजता शिवाजी यादव यांच्या अमृतहस्ते व सूरदास गायकवाड महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत वीणापूजन करुन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर ज्ञानेश्वरी पारायण, 11 ते 12 गाथा भजन, सायंकाळी 5 ते 6 हरीपाठ, 7 ते 8 प्रवचन व रात्री 8 ते 10 सूरदास गायकवाड महाराज यांचे कीर्तन झाले. त्यांना हणबरवाडी व भाटनांगनूर येथील भजनी मंडळांनी टाळ साथ-संगत केली. किर्तन झाल्यावर आरती करण्यात आली. त्यानंतर प्रसादाचे वाटप करण्यात आले.
गुरुवार तारीख 7 रोजी सकाळी श्रींना अभिषेक व विधिवत पूजा करण्यात आली. उद्धव काजवे महाराज यांनी पौरोहित्य केले. 9 ते 11 काल्याचे भजन, त्यानंतर आरती केल्यावर महाप्रसादाचे वाटप करुन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
यावेळी रघुनाथ शिंदे, महादेव खोत, रामचंद्र कोळी, सुनिल घुगरे, ओंकार यादव, रामदास घुगरे, अथर्व खोत यांच्यासह भाविक उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta