बेळगाव फेसबुक फ्रेंड सर्कलतर्फे मदत : दिले तीन महिन्याचे अन्नधान्य
निपाणी (विनायक पाटील) : राशिंग (ता. हुक्केरी) येथील रहिवासी बाबुराव मारुती चौगुले (वय४५) यांचे चार दिवसापूर्वी आकस्मिक निधन झाले आहे. घरातील कर्ता पुरुष निघून गेल्यामुळे या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे. ही बाब गांभीर्याने घेऊन फेसबुक फ्रेंड सर्कलकडून जीवनावश्यक वस्तूंची मदत करण्यात आली.
सदर विधवा महिला विभक्त असून परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. तिच्या कुटुंबात १२ वर्षाची मुलगी व ९ वर्षाचा मुलगा आहे. कोणतीही आर्थिक बाजू भक्कम नसून त्या महिलेला यापुढे मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करावा लागणार आहे. सदर महिलेच्या परिस्थितीची कल्पना बेळगाव येथील फ्रेंड सर्कल ग्रुपच्या सर्व सदस्यांना समजल्यानंतर त्यांनी सदर महिलेला तात्काळ मदत करण्याचे ठरवले. त्यानुसार कुटुंबास मंगळवारी (ता.१०) बेळगाव फेसबुक फ्रेंड सर्कलचे अध्यक्ष संतोष दरेकर, अवधूत तूडवेकर, डॉ. रोहित जोशी, निरज शहा, काका हवल, मधु मेणसे यांच्या टीमतर्फे सदर कुटुंबीयांच्या घरी भेट देऊन दुचाकीवरून ८५ किलोमीटर इतका प्रवास करत तीन महिने पुरेल इतक्या जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करून सदर कुटुंबास मदतीचा हात दिला. या मदतीमुळे कुटुंबाला जगण्याचे बळ मिळाले आहे.
—-
‘कुटुंबातील सदस्यांचे पालनपोषण करणाऱ्या कर्त्या व्यक्तीचे निधन झाल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार फेसबुक वरील मित्रांनी या महिलेला बेळगाव ते राशींग असा दुचाकीवरून प्रवास करून तीन महिन्याचे धान्य पोहोच केले. यापूर्वीही अशा कुटुंबांना फेसबुक सर्कल तर्फे मदत करण्यात आली आहे.’
– संतोष दरेकर, अध्यक्ष, फेसबूक सर्कल, बेळगाव