डॉ. आंबेडकर विचार मंचचा उपक्रम: दास्य मुक्तीतून संघर्षाकडे अभियान
निपाणी (वार्ता) : छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या जयंतीच्या निमित्ताने महापुरुषांचा खरा इतिहास व वारसा आजच्या डॉल्बीच्या युगात विसरून जात आहे. परिणामी महापुरुषांच्या कार्यकर्तृत्वाचा इतिहास लोप पावत आहे. आजचा तरुण दिशाहीन न बनता त्याला सामाजिक समतेची दृष्टी प्राप्त व्हावी. योग्य दिशेने समाजाची वाटचाल पुढे जावी या हेतूने येथील डॉ. आंबेडकर विचार मंचने दास्य मुक्तीकडून संघर्षाकडे ‘शिवराय ते भिमराय’ या अभिवादन अभियानातून महाड ते रायगडला भेट देण्याचा उपक्रम राबविला. त्यामध्ये समाजातील सर्व जाती धर्माच्या सुमारे दोनशे तरुणांना सहभागी करून घेण्यात आले.
सुरुवातीला बहुजन समाजाचे आधारस्तंभ व आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधीला अभिवादन करण्यात आले. जातीभेद निर्मुलनासाठी गंगाराम कांबळेना शाहू महाराजांनी चहाची टपरी काढून दिली होती. त्यांच्या स्मारकाला भेट देऊन महाडच्या ऐतिहासिक चवदार तळ्याला भेट दिली. ठिकाणी सामाजिक समतेच्या वैचारिक जागराचा विविध प्रकारे उपक्रम घेण्यात आला.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते कमलाकर राबते, मिथुन मधाळे, अमित शिंदे, दीपक शेवाळे, रमेश कांबळे, सुधाकर माने यांनी मनोगत व्यक्त केले.
धम्म प्रचारक कपिल कांबळे यांनी धम्म वंदना केले. त्यानंतर महापुरूषांच्या गौरव गीत भिकाजी कांबळे व अजित कांबळे यांनी सादर केला. पुढचा टप्पा म्हणून रायगडला भेट देऊन छत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदना देण्यात आली. या विविध प्रकारच्या वैचारिक जागराचा कार्यक्रमातून दोनशे कार्यकर्ते या महापुरुषांच्या संघर्षमय पराक्रम व व जीवनाच्या इतिहासातून भारावून गेले. उपक्रम यशस्वी करण्यासाठी बोरगाव येथील अरिहंत उद्योग समूहाचे युवा उद्योजक अभिनंदन पाटील, युवा नेते उत्तम पाटील, माजी आमदार सुभाष जोशी, अजितराव पाटील-बेनाडीकर, प्रा. डॉ. कपिल राजहंस, आरपीआय नेते सतीश माळगे व गौतम कांबळे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या मोहिमेचे नेतृत्व डॉ. आंबेडकर विचार मंचचे अध्यक्ष प्रा. सुरेश कांबळे यांनी केले होते.
—–
भोजनातून समतेचा संदेश
गणू गोसावींची नाचण्याची भाकरी, रमेश देसाईंचा खर्डा, भारत पाटलांची आंबील आणि सुरेश कांबळेंच्या दहीचा एकत्रित आस्वाद घेतला. त्यामधून जातीची सर्व बंधने झुगारून एकमेकांच्या मिळून बसून खात असताना एक वेगळा सामाजिक समतेचा संदेश संदेश यातून मिळाला.