प्राचार्य डॉ. कोथळे : सभासद, यशवंत पाल्यांचा गौरव
निपाणी : श्री रवळनाथ को-ऑप. हौसिंग फायनान्स सोसायटीच्या सहज, सुलभ व कमी व्याजदरातील अर्थसहाय्यामुळेच सीमाभागातील रहिवाश्यांची घरबांधणीची अडचण दूर झाली आहे, असे मत प्राचार्य डॉ. एम. बी. कोथळे यांनी व्यक्त केले. श्री रवळनाथ हौसिंग फायनान्सतर्फे आयोजित वयाची पंच्याहत्तरी पूर्ण केलेल्या आणि विविध खात्याच्या शासकीय, निमशासकीय सेवेतून निवृत्त झालेल्या सभासदांचा सत्कार आणि सभासदांच्या यशवंत पाल्यांचा गौरव अशा संयुक्त समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष एम. एल. चौगुले होते. प्रा. डॉ. कोथळे म्हणाले, रवळनाथ ही केवळ एक वित्तीय संस्थाच नसून संवेदनशील मनाच्या विविध क्षेत्रातील दिग्गज आणि गुणीजनांचा एक विशाल परिवार आहे. म्हणूनच या परिवारात काम करण्याचा आत्मिक आनंद वेगळा आहे. एम. एल. चौगुले म्हणाले, केवळ पैशाच्या देवाण-घेवाणीत गुंतून न पडता समाजातील दीन-दुबळ्या व गरजवंताच्या मदतीला धावून जाण्यामुळे रवळनाथची समाजात वेगळी ओळख निर्माण झाली आहे. देवचंद महाविद्यालयाच्या प्रदीर्घ सेवेतून निवृत्त झालेबद्दल निपाणी शाखा चेअरमन प्राचार्य डॉ. पी. एम. हेरेकर यांचा प्राचार्य डॉ. एम. बी. कोथळे यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह देवून सत्कार झाला. यावेळी पंच्याहत्तरी पूर्ण झालेले सत्कारमूर्ती सभासद प्रेमा जनवाडे व सेवानिवृत्त प्राचार्य डॉ. पी. एम. हेरेकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास रवळनाथच्या संचालिका मीना रिंगणे, रेखा पोतदार, शाखा सल्लागार प्रा. डॉ. शिवाजी होडगे, रश्मी व्हदडी, सेवानिवृत्त सभासद परगोंडा पाटील, आण्णाप्पा मलगत्ते, अशोक मोरे, उपप्राचार्या कांचन पाटील, साक्षी चव्हाण, शाखाधिकारी किरण शहा, अकौंटट के. टी. पाटील आणि कर्मचारी उपस्थित होते. शाखा सल्लागार प्रा. प्रविणसिंह शिलेदार यांनी सूत्रसंचालन केले. शाखा सल्लागार बी आर. पाटील यांनी आभार मानले.
Check Also
घटप्रभा नदीत बुडून दोन मुलासह वडिलांचा मृत्यू
Spread the love हुक्केरी : मासे पकडण्यासाठी नदीत उतरले असता वडीलासह दोन मुलांचा नदीत बुडून …