भेंडे कुटुंबाला न्याय न दिल्यास आंदोलन : जिल्हा रयत संघटनेचा इशारा
निपाणी (वार्ता) : सोमवारी (ता.४) ढोणेवाडी येथे झालेल्या घटनेबद्दल चिकोडी जिल्हा रयत संघटनेचे अध्यक्ष राजू पोवार यांनी अनुष्का भेंडे यांच्या घरी भेट देऊन भेंडे कुटुंबाचे सांत्वन केले. त्यानंतर राजू पोवार यांनी घटना घडलेल्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. रेंदाळ रोडवर असणाऱ्या माळावरील शाळेला भेट देऊन शाळेतील संबंधित शिक्षकांच्या बरोबर बैठक घेऊन घटनेबाबत माहिती घेतली. सदरच्या माहितीमध्ये शाळेचे मुख्याध्यापक यांच्याबद्दल धक्कादायक खुलासा करण्यात आला. त्यामुळे या मुख्याध्यापकावर दंडात्मक कारवाई करावी. तसेच प्रशासनाकडून या कुटुंबाला न्याय न मिळाल्यास चिकोडी जिल्हा रयत संघटनेतर्फे आंदोलन करण्याचा इशारा पोवार यांनी दिला.
मुख्याध्यापक नाटेकर हे अथणी तालुक्यातील असून ढोणेवाडी शाळेमध्ये येऊन चार वर्षे झाली. मात्र ते कामावर कधीही हजर नसतात. पंधरा दिवसातून महिन्यातून एक वेळा येऊन सही करून जातात. असे गेली चार वर्षे चालू असून या प्रकाराला आळा घालण्यासाठी गावातील अनेक नागरिक, शाळा सुधारणा कमिटीने गटशिक्षण शिक्षणाधिका-यांना बऱ्याच वेळा निवेदन सादर केले आहे. तरीही गट शिक्षणाधिकाऱ्यांनी या गोष्टीकडे लक्ष दिलेले नाही.
शाळेमध्ये शाळा सुधारणा कमिटी असून या कमिटीला अध्यक्ष, उपाध्यक्ष नाहीत. शैक्षणिक खर्चासाठी अध्यक्षांची सही लागते. मात्र माजी अध्यक्षांची सही घेऊन कारभार चालवला जातो. यासंबंधी सुद्धा गटशिक्षणाधिकारी याकडे तक्रार करूनही आजतागायत दुर्लक्ष केले आहे. मुख्याध्यापक नाटेकर यांच्या बद्दल अनेक तक्रारी असूनही दुर्लक्ष केले आहे.
मुख्याध्यापकांच्या दुर्लक्षामुळे तिसरी मध्ये शिकणारी अनुष्का सदाशिव भेंडे या कोवळ्या जिवाचा बळी गेला आहे. त्यामुळे मुख्याध्यापकावर जुजबी कारवाई न करता भेंडे कुटुंबीयांना ५० लाखाची मदत तात्काळ द्यावी. या कुटुंबाला न्याय न मिळाल्यास चिकोडी जिल्हा रयत संघटना रस्त्यावर उतरून आंदोलन करेल आणि भेंडे कुटुंबाला न्याय देईल असा इशारा चिकोडी जिल्हा रयत संघटनेचे अध्यक्ष राजू पोवार यांनी दिला आहे. यावेळी रयत संघटनेचे कारदगा जिल्हा पंचायत अध्यक्ष बबन जामदार, मानकापूरचे सदस्य रमेश मोरे, ढोणेवाडी येथील एकनाथ सादळकर, विशाल बेनाडे, राहुल पाटील, राकेश जनवाडे, वैभव कांबळे, पिंटू बेनाडे, सुरज जाधव यांच्यासह रयत संघटनेचे कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.