प. पू. महेशानंद स्वामीजी यांचे प्रतिपादन
कोगनोळी : मानवी जीवनाचे अंतरबाह्य सार्थक हे सद्गुरुंच्या सानिध्यामध्ये राहिल्यामुळे मिळते असे विचार प. पू. महेशानंद स्वामीजी यांनी व्यक्त केले.
हंचिनाळ के. एस. (ता. निपाणी) येथील प. पू. ईश्वर स्वामीजी भक्ती योगाश्रम मठामध्ये गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त आयोजित प्रवचन सोहळ्यामध्ये संतांचे जीवन चरित्र या विषयावर पाचवे पुष्प गुंफताना ते बोलत होते.
प. पू. महेशानंद स्वामीजी पुढे म्हणाले, या जगाचा प्रवाह हा निरंतर चालू आहे. जसं जमीन तयार करुन बी-बियाणे आम्ही तयारी ठेवतो. ज्या ढगामधून येणार्या अमृतधारांची वाट पाहतो. जमीन तयार करणे हे आपल्या हातात आहे हे बाह्यकार्य. अंतरकार्य करणारा विश्वरुपी भगवंत आपले कार्य मार्गक्रमाने पार पाडतो. हे जे अधिकार भगवंताच्या अधिपत्याखाली चालतात.
या भगवंताने सर्वांना ज्ञानरुपी बनवून पाठविला आहे. कोणाला प्रवचनकार, कोणाला शिक्षक, कोणाला शेतकरी, कोणाला डॉक्टर, कोणाला कारखानदार, कोणाला वकील, कोणाला उद्योगपती. परंतू जे निसर्गाने चालते तो व्यापकरुपी भगवंत एकटाच आहे असेही शेवटी महेशानंद स्वामीजी यांनी सांगितले.
Belgaum Varta Belgaum Varta