सौंदलगा : सौंदलगा येथे मंगळवारी (ता.१९) श्री मरगुबाई देवीची यात्रा ग्रामस्थांकडून उत्साहात साजरी करण्यात आली. मरगुबाई देवीची यात्रा परंपरेनुसार श्रावण महिना सुरू होण्याअगोदर एक आठवडा आधी साजरी करण्यात येते. या देवीच्या यात्रेनंतर येणाऱ्या श्रावण महिन्यातील पाच मंगळवार पाळक पाळला जातो. या यात्रेनिमित्त परंपरेनुसार कुंभार गल्लीतील सर्व महिला एकत्र येऊन आंबील घुगऱ्यांचा नैवेद्य व ओटीचे साहित्य घेऊन दत्त मंदिर ते मरगुबाई देवीचे मूळ देवस्थान असलेल्या गावातील कुंभार गल्ली येथे सकाळी वाद्याच्या गजरात सर्व महिला आल्या.यानंतर या मूळ मरगुबाई देवीची विधिवत पूजा कुंभार समाजाकडून करण्यात आली. त्यानंतर सजवलेल्या पालखीमध्ये मरगुबाई देवीचा मुखवटा ठेवून पालखी सोहळ्यास सुरुवात करण्यात आली. या पालखी सोहळ्याकडे मध्ये झांज पथक व सनई चौघडा ही पथके सहभागी झाली होती. देवीची पालखी आरेकर गल्ली, पिराची वेश, झेंडा चौक या मार्गावरून नेण्यात आली. यावेळी फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करण्यात आली.महिलांनी पालखीच पाणी घालून औक्षण केले. त्यानंतर नवीन बांधलेल्या मरगुबाई मंदिर येथे पोहोचल्यानंतर मंदिरास प्रदक्षिणा घालून पालखी मंदिरांमध्ये ग्रामस्थांच्या दर्शनासाठी ठेवण्यात आली. यावेळी गाऱ्हाणे घालून सामुदायिक आरती होऊन प्रसाद वाटप करण्यात आला. दिवसभर देवीला गोडा नैवेद्य ग्रामस्थांकडून दाखवण्यात येत होता. तर रात्री खारा नैवेद्य दाखवून यात्रेची सांगता करण्यात आली.
Belgaum Varta Belgaum Varta