राजू पोवार यांचा इशारा : विधानसभेवर रयत संघटनेचा मोर्चा
निपाणी (वार्ता) : देशातील नेते मंडळी व राजकारणांना निवडून देण्याचे काम सर्वसामान्य नागरिक आणि शेतकर्यांनी केले आहे. पण निवडून गेल्यानंतर शेतकरी विरोधी धोरण अवलंबून त्यांना चिरडण्याचे काम सुरू आहे. त्यांच्या समस्या ऐकून घेण्यासाठी राजकीय नेते मंडळींना वेळ कमी पडत आहे. परिणामी शेतकरी दिवसेंदिवस अडचणीत सापडत आहे. शेतकरी हा मालक असून त्याच्यावर अन्याय झाल्यास रस्त्यावरची लढाई लढण्याचा इशारा कर्नाटक राज्य रयत संघटनेचे चिकोडी जिल्हा अध्यक्ष राजू पोवार यांनी दिला. शेतकरी हुतात्मा दिन आणि शेतकर्यांच्या विविध मागण्यांसाठी रयत संघटनेतर्फे बेळगाव येथील विधानसभा मोर्चा काढण्यात आला. त्यावेळी राजू पोवार बोलत होते.
यावेळी राजू पोवार म्हणाले, ढोणेवाडी शाळेतील अनुष्का सदाशिव भेंडे या विद्यार्थिनीचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याने तिच्या कुटुंबाला 50 लाखांची आर्थिक मदत मिळावी, यासाठी आपण आंदोलन केले. मंत्र्यांनी मात्र केवळ 5 लाखांचा धनादेश देत त्याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला. हिंमत असेल तर राज्य सरकारकडून 50 लाखांची भरपाई मिळवून दिल्यास लोकप्रतिनिधींचा जाहीर सत्कार करू. महापुरामुळे नुकसान झालेल्या शेतकर्यांचा सर्व्हे चुकीचा झाला असून याकडे वारंवार मागणी करूनही दुर्लक्ष केले आहे. शेतकर्याला कोणतीही जात, धर्म नसून केवळ राजकारणासाठी शेतकर्यांची कामे थांबवली जात असल्यास या पुढील काळात तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला.
यावेळी रयत संघटनेच्या वतीने जिल्हाधिकार्यांना भेटून मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवून देण्यात आले. त्यामध्ये लॉकडाऊन काळातील शेतकर्यांचे घरफाळा, पाणीपट्टी व विज बिल माफ करावे, शेतकर्यांना 24 तास शेतीची वीज मिळावी, ऊसाला पाच हजार रुपये प्रति टन भाव मिळावा, शेतकर्यांच्या मुलांना शाळा महाविद्यालयात प्रवेशासाठी आरक्षण मिळावे, शेतकर्यांना मिळणार्या सुविधांनी निःपक्षपातीपणे मिळाव्यात, साखर कारखान्याच्या सभासदांना प्रत्येकी 100 किलो साखर मिळालीच पाहिजे यासह विविध मागण्या करण्यात आल्या.
यावेळी संघटनेचे राज्य अध्यक्ष चुन्नाप्पा पुजारी, गौरव अध्यक्ष शशिकांत पडसलगी, गणेश ऐगर, राघवेंद्र नाईक, प्रकाश नाईक यांनी शेतकर्यांच्या समस्या व्यक्त केल्या.
यावेळी रवी सिद्धनावर, चंद्रगौडा पाटील, उमेश भारमल, भगवंत गायकवाड, सर्जेराव हेगडे, संजय पोवार, कलगोंडा कोटगे, नामदेव साळुंखे, बाबासाहेब पाटील, विजय गुरव, बाळकृष्ण पाटील, सुभाष देवर्षी, विवेक जनवाडे, हालप्पा ढवणे, बबन जामदार, रमेश मोरे, पवन माने, वैभव कुंभार, बाळू साळुंखे, सदाशिव शेटके, अशोक कुंभार, संजय जोमा, हरी जाधव, नाना कुंभार, माणिक कांबळे, अनंत पाटील, रामगोंडा पाटील, रवींद्र चेंडके, आर. वाय. पाटील यांच्यासह निपाणी, हुक्केरी, अथणी, गोकाक, बेळगाव तालुक्यातील संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta