भारत मातेचीही प्रतिमा : निपाणीतील बक्कनावर कुटुंबीयांचा उपक्रम
निपाणी (विनायक पाटील) : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त केंद्र व राज्य सरकारतर्फे ’हर घर तिरंगा’ मोहीम राबविण्यात येणार आहे. 11 ते 17 ऑगस्ट या कालावधीत घराघरांत झेंडा फडकेल. मात्र निपाणीमधील संभाजीनगर येथील सामाजिक कार्यकर्ते अजित बक्कनावर यांनी आपल्या देवघरात भारत मातेची प्रतिमा आणि तिरंगा ध्वजाची पूजा केली आहे. ’मनामनांत हिंदुस्थान, घराघरांत हिंदुस्थान’ या घोषवाक्यातून भारतमातेचे घराघरांत पूजन करावे, असे आवाहनही बक्कनावर यांनी केले.
सामाजिक कार्यकर्ते अजित बक्कनावर यांचे विद्युत मोटर दुरुस्तीसाठी लागणार्या साहित्याचे दुकान असून त्यांची पत्नी महानंदा बक्कनावर या शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. बर्याच वर्षापासून स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन आणि राष्ट्रीय सणांच्या वेळी कापडी ध्वज घरीच उभारतात. मात्र यंदा ’हर घर तिरंगा’ या उपक्रमामुळे तिरंगा ध्वजापाठोपाठ भारत मातेची प्रतिमा आणि तिरंगा एकत्रित करून त्याची पूजा सुरू केली आहे.
पूर्वीपासूनच बक्कनावर कुटुंबीयांमध्ये देश प्रेमाची भावना आहे. स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन हे दोन्ही सण दिवाळीसारखे साजरी करतात. आपले दुकान सांभाळण्याबरोबरच सामाजिक कार्य व वृक्ष लागवड चळवळीमध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे. निपाणी शहर आणि परिसरातील शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालये, अधिकारी, संपर्कात येणार्या व्यक्तींना शेकडो रोपे दिली आहेत. याशिवाय आपल्या कन्येच्या वाढदिवसानिमित्त सर्वसामान्य कुटुंबातील मुलीला शैक्षणिक दत्तक घेतले आहे.
—-
देश प्रेमाबाबत जागृती
’मनामनात हिंदुस्थान, घराघरात हिंदुस्थान’ देशातील प्रत्येक घराघरात भारतमातेची पूजा व्हायला हवी. शाळांमध्ये राष्ट्रगीत, प्रार्थना कार्यक्रमावेळी विद्यार्थ्यांसमोर हिंदुस्थानचा नकाशा, भारत मातेची प्रतिमा आणि तिरंगा समोर असायला हवा. त्यामुळे देशप्रेम निर्माण होईल. त्याच्या जागृतीसाठीच बक्कनावर यांनी हा उपक्रम राबविला आहे.
—-
’ज्या मातीने जन्म दिला, ज्या मातीने जगवले, तिच्यामुळेच आपले अस्तित्व आहे. तिच्या रक्षणासाठी जवान सीमेवर लढत आहेत. त्यांच्याबद्दल प्रत्येकाला आदर असलाच पाहिजे. विद्यार्थ्यांनी सतत मनात नेहमी देशसेवा व देशभक्तीची भावना ठेवली पाहिजे, या उदात्त हेतूने हा उपक्रम राबविला आहे.’
– अजित बक्कनावर, संभाजीनगर, निपाणी
Belgaum Varta Belgaum Varta