महिलांचा तहसीलदार कार्यालयावर मोर्चा : शहर ग्रामीण, महिलांची रॅली
निपाणी (वार्ता) : महिलांना गृह उद्योगाचे आमिष दाखवून बटन रंगविण्याच्या नावाखाली कोट्यावधी रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली. त्यानंतर निपाणीत शुक्रवारी (ता.५) दुपारी या प्रकरणातील मुख्य आरोपीसंह संबंधित आरोपीवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी हजारो महिलांनी तहसिलदार कार्यालयावर मोर्चा काढून ठिय्या आंदोलन केले. आठवड्याभरात सर्वच महिलांना न्याय न मिळून संबंधित महिलांना रक्कम परत न मिळाल्यास पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा महिलांनी दिला. त्यानंतर तहसीलदार प्रवीण कारंडे यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले.
शहर आणि ग्रामीण भागातील फसवणूक झालेल्या हजारो सकाळी अकरा वाजता महिला येथील धर्मवीर संभाजीराजे चौकात एकत्र आल्या. तेथून जुना पीबी रोड साखरवाडी मार्गे आरोपींना अटक करा अशा घोषणा दतहसिलदार कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी विविध घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता.
महिन्यात बटन रंगवून रोजगार देण्याच्या नावाखाली या प्रकरणातील मुख्य आरोपी अजित हिरवे, अशोक पाटील, प्रकाश घाटगे, काजल पाटील यांनी हजारो महिलांना जाळ्यात ओढून कोट्यवधी रुपयांनी फसवणूक केली आहे. या आरोपींना तात्काळ अटक करावी. त्यांची मालमत्ता जप्त करून संबंधित महिलांना रक्कम परत करावी अशी मागणी मोर्चातील सहभागी महिलांनी केली.
यावेळी पीडीत महिला आफ्रीन जमादार, वैशाली भोसले यांनी, रोजगार देण्याच्या भूलथापांना बळी पडून अनेक महिलांनी आपल्याकडील सोने गहान ठेवून या योजनेत पैसे गुंतवले आहेत. अनेक महिलांचे संसार उध्वस्त होण्याची वेळ आली आहे. खून, चोरी प्रकरणातील आरोपींना पोलिस तात्काळ जेरबंद करतात. मात्र या प्रकरणाला महिना उलटला तरी आरोपींना पकडण्याकडे पोलिसांचे दुर्लक्ष झाले आहे. निपाणी पोलिसांनी या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करून लवकरात लवकर आरोपींना अटक करावे, अन्यथा जिल्हा पोलिस प्रशासनाकडे न्याय मागणार असल्याचे सांगीतले.
यावेळी तहसिलदार कार्यालयासमोर विविध घोषणा देत महिलांना तासभर ठिय्या मारला. रमेश कांबळे यांनी या प्रकरणात हजारो महिला अडकल्या असून या सर्व महिलांना न्याय मिळवून देण्याचे अश्वासन दिले. महिलांच्या मागण्याचे निवेदन तहसिलदार प्रविण कारंडे, मंडल पोलीस निरीक्षक संगमेश शिवयोगी यांना देण्यात आले.
यावेळी राजू नाईकवाडे, विनायक बेनाडे, विकास शितोळे, स्वप्नील वराळे, विकास वाडकर, उस्मान मुजावर, गणेश वंदुरे, समीर मुजावर, प्रविण चव्हाण, शिवाजी कोकणे, शब्बीर शेंडूरे, सिकंदर मुल्ला, जयपाल चौगुले, साद मुजावर, पल्लवी बेडकीहाळे यांच्यासह निपाणी शहर आणि ग्रामीण भागातील महिला उपस्थित होत्या. बसवेश्वर चौक पोलीस ठाण्याचे गुन्हे अन्वेषण विभागाचे उपनिरीक्षक डी. बी. कोतवाल, ग्रामीण पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक अनिलकुमार कुंभार व सहकाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
Belgaum Varta Belgaum Varta