कागल पोलिसांची कारवाई : रत्नागिरीचा आरोपीही ताब्यात
निपाणी (वार्ता) : महाराष्ट्रात गुटखा व सुगंधी पान मसाला विक्रीला बंदी आहे. तरीही निपाणी सीमाभागातून मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात गुटख्याची तस्करी होत आहे. ही बाब गांभीर्याने घेऊन कागल पोलीसांकडून पान मसाला व सुगंधी तंबाखु गुटखा विक्री करणेसाठी घेवून जाणाऱ्या दोघांना पकडले. त्यांच्याकडून १ लाख ४१ हजार ४८४ रुपये किमतीचा गुटखा व ३ लाख ८० हजार रुपये किमतींच्या दोन गाड्या असा ५ लाख २१ हजार ४८४ रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. अश्रफ हाजीदावूद मेमन ( वय ४२, फ्लॅट नं ९, फातिमा अपार्टमेंट, मच्छी मार्केटजवळ, रत्नागिरी) व साहिल ईस्माईल बागवान (वय२५, शिवाजीनगर, आझाद गल्ली, निपाणी, ता.चिकोडी ) यांना अटक करण्यात आली. शाहू कारखाना रोडवर ही कारवाई करण्यात आली. अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत गोसावी यांनी दिली.
या मार्गावर गुटखा वाहतूक होत असल्याची माहिती खबऱ्यांकडून कागल पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सापळा रुसून कागल पोलिसांनी ही कारवाई केली आहे. मेनन व बागवान यांचे ताब्यातून व्हॅगनआर व इंडिका व्हिस्टा अशी दोन वाहने तसेच पान मसाला व सुगंधी तंबाखु गुटखा जप्त करण्यात आलेला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे व उप विभागीय पोलीस अधिकारी संकेत गोसावी यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अजितकुमार जाधव, पोलीस उपनिरीक्षक मोनिका खडके, पोलीस हावलदार विजय पाटील, पोलीस नाईक मोहन माटूंगे, पोलीस अंमलदार प्रभाकर पुजारी, आसमा जमादार, संदेश पोवार यांनी ही कारवाई केली.
—
बोरगाव कागल मार्गे तस्करी
महाराष्ट्रमध्ये गुटख्याची विक्री बंदी असताना कर्नाटक सीमाभागातून मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात गुटख्याची तस्करी सुरू आहे. यापूर्वी निपाणी बोरगाव मार्गे इचलकरंजीला मोठ्या प्रमाणात गुटख्याची तस्करी झाली आहे. कर्नाटकात स्वस्तात मिळणारा गुटखा महाराष्ट्रात चढ्यादराने चोरट्या पद्धतीने विकला जात आहे ही बाब लक्षात घेऊन कागल पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta