Saturday , October 19 2024
Breaking News

’हर घर तिरंगा’ उपक्रमास निपाणीकरांचा प्रतिसाद

Spread the love

 

ध्वजांची टंचाई : दुकानात चढ्या दराने विक्री
निपाणी (वार्ता) : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देशभर राबविण्यात आलेल्या हर, घर तिरंगा उपक्रमामध्ये निपाणीकरांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. शहरातील प्रत्येक घरावर तिरंगा फडकाविण्यात आला. अनेक ज्येष्ठ नागरीकांनी विधीवत ध्वजाचा पूर्णपणे सन्मान करीत तिरंगा ध्वजारोहण केले.
शहरातील नगरपालिका, तहसील, पोलीस स्थानक, नगर नियोजन, उपनोंदणी, शिक्षण खात्याचे कार्यालय, बालकल्याण खाते, न्यायालय, सर्व शासकीय कार्यालये, राष्ट्रीयीकृत बँका, सहकारी पतसंस्था, विविध संस्था संघटनांनी राष्ट्रीय ध्वजारोहण केले. स्वातंत्र्यदिनापर्यंत सदर प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. यानिमित्ताने सर्वत्र देशभक्तिचे तिरंगामय वातावरण निर्माण झाले आहे.
मंत्री शशीकला जोल्ले यांनी नगरपालिका कार्यालयात शहरातील सुमारे 14 हजार घरांवर तिरंगा फडकाविण्याकरिता सुमारे 11 हजार तिरंगा ध्वजांचा पुरवठा नगरपालिका प्रशासनाला करून त्याचे वितरणाचे काम नगरपालिका प्रशासन करत असल्याचे जाहीर केले होते. मात्र नगरपालिका प्रशासनाने 11 हजारपैकी केवळ सुमारे 7 हजार तिरंगा ध्वजाचे वितरण केले आहे. याबाबत चौकशी केली असता 11 हजार पैकी सुमारे 6 हजार तिरंगा ध्वजामध्ये कोणती ना कोणती कसूर राहिल्याने ते वितरीत करण्यात आले नसल्याची माहिती मिळाली. त्यामुळे शहरातील अनेक घरांना तिरंगा उपलब्ध न झाल्याने त्यांनी नगरपालिकेत जावून ध्वज मिळविण्यासाठी प्रयत्न केल्याचे दिसून आले. पण बर्‍याच कुटुंबातील सदस्यांना तिरंग्या अभावी रिकाम्या हाताने घराकडे परतावे लागले. शहर आणि ग्रामीण भागातील अनेक शाळांनी आजादी का अमृत महोत्सव या उपक्रमात विद्यार्थ्यांची जनजागृती फेरी काढली त्यासाठी मोठ्या प्रमाणात ध्वजांची खरेदी झाली होती. त्यामुळे दुसर्‍या दिवशी ध्वजांची टंचाई निर्माण झाली होती.
—-
चढ्या दराने तिरंगा विक्री
शहरातील टपाल, बीएसएनएल, नगरपालिका कार्यालय यासह काही ठिकाणी 20-25 रुपये दराने तिरंग्याची विक्री करण्यात येत होती. पण त्या ठिकाणचे ध्वज संपल्यानंतर अनेक नागरिकांनी दुकानातील ध्वज खरेदीचा प्रयत्न केला. पण यावेळी ध्वजाची विक्री 60 ते 100 रूपयापर्यंत करण्यात येत असल्याचे दिसून आले. परिणामी सर्वसामान्य कुटुंबीयांना आर्थिक फटका बसला.

About Belgaum Varta

Check Also

निपाणीत उरुसाला प्रारंभ

Spread the love  धार्मिक कार्यक्रमासह शर्यती : कुस्ती मैदानाचेही आयोजन निपाणी (वार्ता) : येथील संत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *