निपाणी (वार्ता) : कुर्ली गावचे शहीद जवान हुतात्मा जोतिराम सिदगोंडा चौगुले यांच्या 37 व्या स्मृतीदिनानिमित्त एचजेसी चीफ फौंडेशन यांच्यावतीने आजी-माजी सैनिक मेळावा व निपाणी येथील मंगलमूर्ती हॉस्पिटल यांच्या सहकार्याने मोफत आरोग्य तपासणी शिबिर ऑनररी कॅप्टन तानाजी पाटील- मैराळ यांच्या अध्यक्षतेखाली झाले. प्रमुख पाहुणे म्हणून ऑनररी सुभेदार मेजर सुरेश साजने उपस्थित होते.
एस. एस. चौगुले यांनी प्रास्ताविक केले. डी. एस. चौगुले व महादेव चौगुले यांच्या हस्ते आरोग्य शिबिराचे तर तानाजी पाटील व धोंडीराम माळी यांच्याहस्ते माजी सैनिक स्नेह मेळाव्याचे उद्घाटन झाले.
आठ मराठा बटालियनचे ऑनररी सुभेदार मेजर सुरेश साजने यांनी 18 ऑगस्ट 1985 रोजी लेह लढाख येथे शहीद जोतिराम चौगुले यांच्या वीरमरणाचा प्रत्यक्ष घडलेल्या प्रसंगाचा उहापोह केला. त्यावेळी उपस्थितांचे डोळे पाणावले. ऑनररी कॅप्टन दिलीप पाटील यांनी देशाच्या सुरक्षेमध्ये लष्कराचे योगदान याबाबत मार्गदर्शन केले. नानासाहेब पाटील, डॉ. अमित होगाडे यांनीही मनोगत व्यक्त केले. हेमंत चौगुले यांच्याहस्ते 80 माजी सैनिकांचा सन्मान करण्यात आला. निपाणी येथील मंगलमूर्ती हॉस्पिटल यांच्यावतीने मोफत बीपी, शुगर, रक्तगट व डोळे तपासणी करण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते आरोग्य सेवा देणार्या सेवकांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमास शिवाजी चौगुले, सिताराम चौगुले, बाबासाहेब चौगुले, विठ्ठल चौगुले, रमेश पाटील, नितीन चौगुले, सागर चौगुले, उदय चौगुले, रमेश चौगुले, एन. एन. चौगुले, जयदीप चौगुले, राजेंद्र पाटील, मोहन चौगुले, आजी माजी सैनिक संघटना पदाधिकारी, एचजेसी चीफ फौंडेशनचे सर्व सदस्य व महिला उपस्थित होत्या. राजेंद्र चौगुले यांनी सूत्रसंचालन केले तर विनोद चौगुले यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta