कोगनोळी : येथे सर्पाने दंश केल्याने आठ वर्षीय शालेय विद्यार्थ्याच्या मृत्यू झाल्याची घटना शनिवार तारीख 22 रोजी रात्री नऊच्या सुमारास घडली.
पार्श्व शांतिनाथ गोटूरे वय आठ असे मृत झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की, येथील प्राथमिक मराठी मुलांच्या शाळेत इयत्ता पहिली मध्ये शिकत असणारा पार्श्व हा हणबरवाडी रोडवर असणाऱ्या महादेव नगरातील आपल्या घराजवळ सायंकाळी सहा वाजता खेळत होता. याच दरम्यान विषारी सर्पाने दंश केला. पार्श्वला तात्काळ कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात नेण्यात आले. पण त्याच्यावर उपचार सुरू असताना त्याचे निधन झाले.
मुळगाव कोथळी येथील शांतिनाथ गोटूरे हे येथील सैनिक शाळेत जेवण बनवण्याचे काम करतात. येथील महादेव नगरात ते भाडोत्री घरात राहत आहेत. या घरासमोरच खेळत असताना पार्श्वला सर्पदंश झाला. या घटनेमध्ये त्याचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
पार्श्वच्या पश्चात आजा, आजी, आई, वडील, एक लहान बहीण असा परिवार आहे.
Belgaum Varta Belgaum Varta