माजी मंत्री सतीश जारकीहोळी : मानव बंधुत्व वेदिकेचा उपक्रम
निपाणी (वार्ता) : देश आणि राज्यांमध्ये भाजप सरकार आल्यापासून डॉ.बाबासाहेब आंबेडकर, गौतम बुद्ध, महात्मा ज्योतिबा फुले, महात्मा बसवेश्वर, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, संत गाडगेबाबा महाराज त्यांचे विचार संपवण्याचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे कर्नाटक राज्य मानव बंधुत्व वेदिकेच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षापासून जनजागृतीचे काम सुरू आहे. रविवारी (ता.६) पासून संपूर्ण राज्यभर जनजागृती मोहीम सुरू होणार आहे त्याची सुरुवात निपाणी येथील मुन्सिपल हायस्कूलच्या पटांगणावरून होणार आहे. यावेळी निपाणी आणि परिसरातील नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन माजी मंत्री सतीश जारकीहोळी यांनी केले. येथील शासकीय विश्राम जमात बुधवारी (ता.२) सायंकाळी आयोजित पत्रकार बैठकीत ते बोलत होते.
व्यासपीठावर माजी मंत्री वीरकुमार पाटील, चिकोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे उपस्थित होते.
माजी मंत्री जारकीहोळी म्हणाले, मानव बंधुत्व वेदिकाच्या माध्यमातून प्रत्येक घराघरात महापुरुषांचे विचार रुजवण्याचा प्रयत्न होणार आहे. रविवारच्या कार्यक्रमात म्हैसूर येथील ज्ञानप्रकाश स्वामी, सुषमा अंधारे, चैतन्य महाराज यांच्यासह मान्यवर थोर पुरुषांच्या जीवनावर प्रकाशझोत टाकणार आहेत. या कार्यक्रमाचा राजकारणाशी कोणताही संबंध नसून गेल्या दहा वर्षापासून हे कार्य निरंतरपणे सुरूच आहे. ही जनजागृती मोहीम सलग तीन ते चार वर्षे सुरूच राहणार आहे. त्याचा सीमा भागातूनच प्रारंभ होत असून चामराज नगर पर्यंत हा उपक्रम सुरू होणार आहे. भविष्यात महापुरुषांचे विचार कायम राहावेत यासाठी घराघरात जनजागृतीसाठी शंभर कार्यकर्त्यांचे पथक प्रशिक्षण पूर्ण केले आहे.
पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना जारकीहोळी म्हणाले, या उपक्रमाचा राजकीय लाभही होऊ शकतो. शिवाय मुख्यमंत्री पदाची तयारीही असेल. पाणी मतदारसंघातून माजी मंत्री वीरकुमार पाटील माजी आमदार काकासाहेब पाटील काँग्रेस जिल्हा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांच्यापैकी सर्वे करून एका उमेदवाराला तिकीट दिले जाणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपली सर्वतोपरी तयारी झाली असून कार्यकर्त्यांच्या व नेत्यांच्या गाठीभेटी सुरू आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आतापासूनच निवडणुकीच्या तयारीला लागावे असेही त्यांनी सांगितले.
Belgaum Varta Belgaum Varta