जिल्हा पोलीस प्रशासनाची कारवाई :अनेक गुंडांचे धाबे दणाणले
निपाणी (वार्ता) : चिकोडी उपविभागाचे प्रांताधिकारी यांच्या आदेशानुसार जिल्हा पोलीस प्रशासनाने मटका जुगार यासह गंभीर गुन्ह्यात वारंवार सहभाग असणाऱ्या दोघा जणांवर तडीपारीची कारवाई केली. यामध्ये चंद्रकांत शंकर वडर (रा.अकोळ) व संजय चंद्रकांत फराकटे (रा. जामदार प्लॉट,निपाणी) अशी तडीपार झालेल्यांची नावे आहेत. दरम्यान या कारवाईमुळे मटका, जुगार यासह अवैध व्यवसायात कार्यरत असलेल्या अनेकांचे धाबे दणाणले आहेत.
हद्दपार करण्यात आलेल्या वडर यांच्यावर निपाणीसह बेळगाव जिल्ह्यात विविध ठिकाणी ३६ मटका प्रकरणी गुन्हे दाखल असून त्यांना या हद्दपारीच्या आदेशान्वये ९ महिने कोलार जिल्ह्यात तर संजय फराकटे यांच्यावर चार गुन्हे दाखल असून त्याला एक महिन्यासाठी रामदुर्ग तालुक्यात वास्तव्य करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
याप्रकरणी चिकोडी उपविभागाचे पोलीस उपाधीक्षक बसवराज यलीगार यांच्या मार्गदर्शनाखाली मंडल पोलीस निरीक्षकसंगमेश शिवयोगी यांच्यासह ग्रामीण पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक अनिलकुमार व शहर पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षक कृष्णवेनी गुर्लहोसुर यांनी संशयित हद्दपार केलेल्या दोघांवरील आतापर्यंत नोंद असलेल्या गुन्ह्यांची तपासणी करून तसा प्रकारचा अहवाल जिल्हा प्रशासनाला सादर केला होता. यामध्ये जिल्हा प्रशासनाने याबाबतची यादी प्रांताधिकारी यांच्याकडे पाठविण्यात आली होती. त्यानुसार ही कारवाई करण्यात आल्याची निपाणीचे माहिती मंडल पोलीस निरीक्षक संगमेश शिवयोगी यांनी दिली.
Belgaum Varta Belgaum Varta