Tuesday , March 3 2026
Breaking News

सामाजिक जाणिवेतून कोरोना योद्ध्यांना किट

Spread the love
उत्तम पाटील : निपाणी मतदार संघात १५०० जणांना वाटप
निपाणी : दोन महिन्यापासून निपाणीसह परिसरात कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. या काळात अंगणवाडी, आशा कार्यकर्त्या, ग्रामपंचायत, नगरपालिका कर्मचारी, वैद्यकीय मंडळी, पत्रकार जीवावर बेतून काम करत आहेत. या कोरोना योद्ध्यांची दखल घेऊन बोरगाव अरिहंत परिवाराचे संस्थापक रावसाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली युवा उद्योजक अभिनंदन पाटील यांच्या सहकार्याने आपल्या मार्गदर्शनाखाली निपाणी मतदार संघातील १५०० कोरोना योद्ध्यांना १५ लाखाच्या जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात आले. या पुढील काळात कोरोनामुळे मृत पावलेल्या कुटुंबीयांना मदत देण्याचा अरिहंत परिवाराचा मानस असल्याचे बोरगाव पीकेपीएस अध्यक्ष युवानेते उत्तम पाटील यांनी सांगितले. निपाणी येथे सोमवारी (ता. २४) मतदारसंघातील कोरोना योद्ध्यांना सोशल डिस्टन्स ठेवून जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप करून ते बोलत होते.
अरिहंतच्या निपाणी शाखेचे व्यवस्थापक आर. एम. बन्ने यांनी स्वागत केले. उत्तम पाटील म्हणाले, कोरोनामुळे गेल्या वर्षापासून अनेकांचे उद्योग, व्यवसाय बंद आहेत. मजुरांची अवस्था बिकट झाली आहे. यापुढील काळातही संकटसमयी मदत करण्याचा प्रयत्न राहणार आहे.
माजी नगराध्यक्ष विलास गाडीवड्डर यांनी, संकटसमयी अरिहंत परिवाराने माणुसकीचे दर्शन घडवित राबविलेला उपक्रम स्तुत्य आहे. परिवारातील सदस्य कोणत्याही पदावर नसताना केलेली मदत महत्त्वपूर्ण आहे.
नगरसेवक बाळासाहेब देसाई सरकार यांनी उपक्रमाची प्रशंसा केली. उत्तम पाटील व मान्यवरांच्या हस्ते १५०० कोरोना योद्ध्यांना प्रत्येकी पाच किलो ज्वारी, गहू, साखर, तांदूळ, १ किलो गोडेतेल, चहापूड, साबण, मीठ आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. यामध्ये २१० आशा कार्यकर्त्या, २८० अंगणवाडी शिक्षिका, २८० अंगणवाडी कार्यकर्त्या, ४५४ ग्रामपंचायत आणि नगरपालिका सफाई कर्मचारी, २३ तलाठी, ३६ सहाय्यक तलाठी, १७ ग्रामविकासाधिकारी, ३० ग्रामपंचायत सचिवांचा समावेश आहे.
कार्यक्रमास नगरसेवक रवींद्र शिंदे, माजी सभापती सुनील पाटील, संजय पावले, शेरू बडेघर, अनिस मुल्ला, दिलीप पठाडे, सुंदर पाटील, शौकत मणेर, शिरीष कमते, दत्ता नाईक, प्रा. बाळासाहेब सूर्यवंशी, अशोककुमार असोदे, रमेश भोईटे, बबन घाटगे, मुकुंद रावण, रमीज मकानदार, संदीप इंगवले अप्पासाहेब शेटके यांच्यासह अरिहंत परिवाराचे सदस्य व कर्मचारी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

आगारातील खड्डे, कचऱ्यावरून आगार प्रमुखांची झाडाझडती

Spread the love  पंचहमी योजना पदाधिकारी आक्रमक आठवड्याभरात समस्या सोडविण्याच्या सूचना निपाणी (वार्ता) : प्रवाशांची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *