कोल्हापूर : येत्या १६ जूनला राजर्षी छत्रपती शाहू स्मारक समाधी परिसरात मोर्चा नाही तर मूक आंदोलन होणार असून मंत्री, खासदार व आमदारांनी मराठा आरक्षणासाठी नक्की काय करणार याची ठोस भूमिका तेथे जाहीर करावी, असे आवाहन खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी आज येथे केले. १६ जूनला दहा ते एक या वेळेत लाक्षणिक उपोषण होणार असून, आंदोलनाच्या परिसरात कोल्हापूर व राज्यातील समन्वयक, २१८५ विद्यार्थी असणार आहेत. त्यांच्यासमोर लोकप्रतिनिधींनी सन्मानपूर्वक येऊन भूमिका मांडावी, असेही त्यांनी सांगितले. सकल मराठा समाजाच्या कोल्हापुरातील समन्वयकांची शासकीय विश्रामगृह येथे बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते.
संभाजीराजे म्हणाले, “या आंदोलनाची दखल शासनाने घेतली नाहीतर पुणे ते मुंबई मंत्रालय असा मोर्चा काढण्यात येईल. या मोर्चात राज्यातील सर्व जिल्ह्यातील मराठा समाजाने सहभागी होऊन ताकद दाखवावी. हा जोर एकदाच असा लावू की, ज्यामुळे सरकारचे डोळे उघडले जातील. आंदोलनाची सुरुवात कोल्हापुरातून होत असून, त्यानंतर नाशिक, अमरावती, संभाजीनगर व रायगड येथे आंदोलन होईल. त्यानंतर अन्य जिल्ह्यातील आंदोलनाची दिशा राज्यातील समन्वयक ठरवतील. आरक्षणाच्या संदर्भात समन्वयक व आम्ही खूप बोललो आहोत. आता जबाबदारी लोकप्रतिनिधींची आहे. केवळ मते मागायला जसे ते येतात, त्याच पद्धतीने समाजासाठी काय करणार हे त्यांनी सांगणे महत्त्वाचे आहे.”
ते म्हणाले, “सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाला आरक्षण नाकारल्यानंतर सत्ताधारी व विरोधी पक्षातले नेते एकमेकांच्या चुका काढत होते. त्यामुळे त्यांनी या चुका काढण्यापेक्षा आरक्षणाचा मार्ग काढण्याची भूमिका घेणे अपेक्षित आहे. त्याकरिता अनेक नेत्यांना भेटून त्यांच्याशी चर्चाही केली. राज्य सरकारने पाच मागण्या मान्य कराव्यात, असेही सांगितले. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी मला भेट घेण्यासाठीही बोलावले. मी मात्र ती भेट नाकारली. कारण या भेटीत मी मॅनेज झालो, असा आरोप माझ्यावर झाला असता. छत्रपती शिवाजी महाराज व राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या रक्ताचा व विचारांचा वारस असल्याने समाजाची दिशाभूल मला करायची नाही. कोल्हापुरातील कोरोनाचा प्रादूर्भाव पाहता १६ जूनला मोर्चा नव्हे तर शाहू समाधी स्मारकाच्या परिसरात मूक आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.”
Check Also
न्यायालयाच्या आवारात वकिलांना सुरक्षा द्या : बेळगाव बार असोसिएशनची मागणी
Spread the love बेळगाव : तामिळनाडूमध्ये, न्यायालयाच्या आवारात एका वकिलावर पहाटेच्या सुमारास जीवघेणा हल्ला झाला …