संकेश्वर (प्रतिनिधी) : नरसिंगपूरजवळ रविवारी झालेल्या इनोव्हा-कंटेनर अपघातातील गंभीर जखमी संकेश्वरचे नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. सचिन मुरगुडे यांचे उपचारादरम्यान रात्री १०.४५ वाजता निधन झाले. अपघातात डॉ. सचिन मुरगुडे यांच्या पत्नी डॉ. श्वेता सचिन मुरगुडे जागीच ठार झाल्या तर कन्या शिया सचिन मुरगुडे उपचारादरम्यान मरण पावल्या. अपघातात एकाच कुटुंबातील तिघेजण मरण पावल्याने लोकांतून हळहळ व्यक्त केली जात आहे. डॉ. सचिन मुरगुडे, पत्नी डॉ. श्वेता, कन्या शिया यांचे मृतदेह दुपारी १ वाजता संकेश्वरात पोचताच नातेवाईकांनी हंबरडा फोडला. डाॅ. मुरगुडे यांच्या कणगला येथील शेतवाडीत शोकाकूल वातावरणात तिघा पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
शोकसभेत बोलताना नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. जेकब संदरवाले म्हणाले, संकेश्वरातील युवा नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. सचिन मुरगुडे काळाच्या पडद्याआड गेले तरी त्यांच्या आठवणी कायम स्मरणात राहणार आहेत.
डाॅ. मंदार हावळ म्हणाले, आम्ही एका मनमिळाऊ मित्राला मुकलो आहोत. आमच्याबरोबर दररोज गप्पागोष्टी करणारा मित्र काळजाच्या पडद्याआड गेला आहे. अपघातात एकाचा परिवारातील तिघांचं निधन झाल्याने मोठा आघात झाल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी डॉ. विकास पाटील म्हणाले, डॉ. सचिन मुरगुडे यांच्या निधनाने संकेश्वरातील वैद्यकीय क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. यापूर्वीच्या अपघातात डॉ. अलीअम्मा अलेक्झांडर, डॉ. सचिन पाटील आणि आता डॉ. सचिन मुरगूडे त्यांच्या पत्नी डॉ. श्वेता कन्या, शिया यांचे निधन झाल्याने मोठी पोकळी निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी डॉ. सचिन मुरगुडे यांचे भाऊजी डॉ. गिरीश, बहिण डॉ. मेघना, उद्योजक अप्पासाहेब शिरकोळी, गजानन क्वळी, शंकरराव हेगडे, गडहिंग्लजचे डॉ. पट्टणशेट्टी, डॉ. बी. एस. पाटील, डॉ. चौगुला, डॉ. शशीकांत कोरे, डॉ. प्रितम हावळ, डॉ. शक्ती कोप्पद, डॉ. स्मृती हावळ, प्रविण नष्टी, राजू बोरगांवी, राजू नडगदल्ली, प्रा.दिगंबर कुलकर्णी, प्रा.सुनिलकुमार, दुरदुंडी पाटील, दयानंद ढंगी, नातेवाईक उपस्थित होते.,