संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वरात धुलीवंदन- रंगपंचमी एकाच दिवशी येत्या रविवार दि. २० मार्च २०२२ रोजी साजरी करण्याचा निर्णय आज पोलीस ठाण्यावर झालेल्या शांतता कमिटीच्या बैठकीत घेण्यात आला. सभेत माजी नगराध्यक्ष श्रीकांत हतनुरी म्हणाले, धुलीवंदन असो रंगपंचमी ज्या-त्या दिवशी साजरे केल्यास सणांचे महत्व टिकून राहणार आहे. अधे-मधे सण समारंभ साजरी करण्याची प्रथा असता कामा नये. दहावी-बारावी विद्यार्थ्यांची परीक्षा लक्षात घेता धुलीवंदन -रंगपंचमी मंगळवार दि. २२ रोजी साजरी करण्याविषयी सांगितले. बैठकीचे अध्यक्षस्थान उद्योजक अप्पासाहेब शिरकोळी यांनी भूषविले होते. त्यांनी विद्यार्थ्यांंची परिक्षा लक्षात घेता येत्या रविवारीच रंगोत्सव साजरा करण्याविषयी सांगितले. जिल्हा बॅंकेचे संचालक गजानन क्वळी यांनी पाठिंबा दर्शविला बैठकिला उपस्थित सर्व मान्यवरांच्या संमतीने रविवारी रंगोत्सव साजरा करण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला आहे. बैठकीला पोलीस निरीक्षक प्रल्हाद चन्नगिरी पोलीस उपनिरीक्षक गणपती कोगनोळी यांनी मार्गदर्शन केले.
प्रारंभी उपस्थितांचे स्वागत हवालदार बी. के. नांगनुरी यांनी केले. सभेला उपनगराध्यक्ष अजित करजगी, नगरसेवक डॉ. जयप्रकाश करजगी, जितेंद्र मरडी, डॉ. मंदार हावळ, हारुण मुल्ला, संकेश्वर घटक काॅंग्रेसचे अध्यक्ष संतोष मुडशी, दिलीप होसमनी, कुमार बस्तवाडी, नंदू मुडशी, प्रशांत कोळी, संतोष कमनुरी, संतोष सत्यनाईक नागरिक उपस्थित होते.