
संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर श्री महालक्ष्मी देवीची यात्रा अजून पाच-सहा वर्षे लांब असताना संकेश्वर मठ गल्लीत आज श्री लक्ष्मी खेळविण्याचा कार्यक्रम लोकांत चांगलाच चर्चेत दिसतो आहे. मठ गल्लीत श्री महालक्ष्मी देवीची मूर्ती आणि इंगळोबा यात्रोत्सवातील पारंपारिक वाद्यांच्या गजरात, गुलालाची उधळण करीत खेळविण्याचा कार्यक्रम पार पडला. सदर व्हिडिओ व्हायरल होताच संकेश्वरकर अचंबित आणि आश्चर्यचकित होऊन व्हिडिओ पहातच राहिले आहेत. लोकांत एकच चर्चा होतांना दिसत आहे. संकेश्वर श्री लक्ष्मी यात्रा अजून लांब आहे. मग आज अचानक श्री लक्ष्मीदेवी मूर्ती कोणी खेळविली? हे जाणून घेण्यासाठी लोकांत मोठे औत्सुक्य निर्माण झाले आहे. याविषयी श्री महालक्ष्मीदेवीचे मूर्तीकार परशराम सुतार यांचेशी संपर्क साधला असता ते म्हणाले, संकेश्वरात श्री महालक्ष्मी देवीची यात्रा नसून हडलगा येथील श्री महालक्ष्मी देवीची नूतन मूर्ती खेळविण्याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. गेली अडीच महिने झाले आपण हडलगा श्री महालक्ष्मी देवीच्या यात्रोत्सवाची मूर्ती तयार करण्याचे काम करीत आहोत. आपण पाच प्रकारच्या लाकडांचा वापर करून ७ फूट आकर्षक मूर्ती आणि इंगळोबा घडविला आहे. आज हडलगा येथील भक्तगण श्री लक्ष्मी देवी मूर्ती घेऊन जाण्यासाठी आले असता नूतन श्री महालक्ष्मी देवीच्या मूर्तीची विधिवत पूजा आणप्पा कुंभार, यांनी केली. तदनंतर श्री लक्ष्मी देवी मूर्ती खेळविण्याचा कार्यक्रम यात्रोत्सवातील पारंपारिक वाद्यांच्या गजरात गुलालाची उधळण करीत करण्यात आला. तदनंतर हडलगा येथील महादेव सुतार व यात्रा कमिटकडे श्री लक्ष्मी देवी मूर्ती सोपविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
Belgaum Varta Belgaum Varta