संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर पालिकेला स्वच्छतेचे दुसरे पुरस्कार मिळाल्याबद्दल नगरसेवकांतून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. परवा पालिकेच्या मासिक सभेत नगरसेवकांनी थेट मुख्याधिकारी जगदीश ईटी यांना संकेश्वर पालिकेला स्वच्छतेचा बहुमान कोणी दिला. असा प्रश्न विचारला.गावात स्वच्छतेच्या नावे लोकांत शिमगा सुरू असताना पालिका स्वच्छतेच पुरस्कार मिळविणारी ठरली आहे.
गावात कोठेच स्वच्छता नसल्याचा गंभीर आरोप माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक संजय शिरकोळी यांनी केला आहे. ते म्हणाले, गावात लोक स्वच्छतेच्या नावाने शिमगा करताहेत. असे असतांना संकेश्वर पालिका स्वच्छतेच दुसरा क्रमांक पटकाविणारी ठरली आहे. कोणत्या निकषांवर पुरस्कार बहाल करण्यात आला. हेच पालिका सदस्यांना समजेनासे झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
राम जाणे
माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक अमर नलवडे म्हणाले, संकेश्वर पालिका स्वच्छतेच्याबाबतीत पिछाडीवर असतांना कोणी दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार दिला. हेच समजेनासे झाले आहे. पुरस्कार प्राप्त संकेश्वर पालिकेची ही अवस्था असतांना ज्यांना पुरस्कार दिला गेला नाही. त्या पालिकांची स्थिती काय असावी. हे राम जाणे. असे सांगून ते म्हणाले पालिका गावात कचरा इतस्ततः फेकून देणाऱ्या लोकांवर दंडात्मक कारवाई करण्याचे सोडून लाखो रुपये खर्चून सीसीटीव्ही बसविण्याचा विचार करत आहे.सरकारचे लाखो रुपये कचऱ्यात न टाकता त्याचा सदुपयोग व्हावा याकरिता प्रार्थना स्थळांजवळ, मंदिरांजवळ सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.
जोपर्यंत एकी नाही तोपर्यंत कचऱ्याचा विषय निकालात लागणार नसल्याचे सभापती सुनिल पर्वतराव यांनी सांगितले. गावातील सर्व २३ प्रभागात सर्व सफाई कामगारांना एकत्र बोलावून घेऊन स्वच्छतेचं काम करायला हवे असल्याचे त्यांनी सांगितले.