संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर पालिकेचे मुख्याधिकारी जगदीश ईटी हे २४×७ पाणीपुरवठा योजनेची चुकीची माहिती देऊन नगरसेवकांची दिशाभूल करीत असल्याचे नगरसेवक डॉ. जयप्रकाश करजगी यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
ते म्हणाले, मुख्याधिकारी जगदीश ईटी यांनी सर्व २८ सदस्यांनी वर्षाकाठी दोन हजार रुपये पाणीपट्टीचा ठराव मांडला होता.त्या ठरावाला ईटी यांनी केराची टोपली दाखवली आहे. त्यांनी पालिका सभेत संकेश्वरातील ७५% नळधारकांची पाणीपट्टी वर्षाकाठी ९६० ते १२०० रुपये येत असल्याचा बोगस डाटा सादर केला आहे.संकेश्वरातील कमी पाणीपट्टी भरणाऱ्या त्या ४४०० नळधारकांची ईटी साहेबांनी नावे जाहीर करण्याची मागणी आपण करीत आहोत. संकेश्वरातील लोक नळपाणी पट्टी अव्वाची सव्वा झाल्याची तक्रार करीत आहेत. त्याच सोयरसुतक मुख्याधिकारींना नाही. गावात २४×७ पाणीपुरवठा योजनेचे पाणी केवळ तास दोन तास पुरविले जाते. पाणीपट्टी मात्र २४×७ योजनेनुसार मिटर रेडिंगने केली जात आहे. गावात २४ तास पाणीपुरवठा योजना कार्यान्वित नसतांना मिटर रेडिंगनुसार पाणीपट्टी कशासाठी? असा प्रश्न उपस्थित करुन ते पुढे म्हणाले मुख्याधिकारी जगदीश ईटी यांच्या मनमानी कारभाराला लोक आणि पालिकेतील सर्व सदस्य कंटाळले आहेत. पालिकेत नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष सभापती, नगरसेवक-नगरसेविका यांच्या शब्दाला किंमत नाही. पालिकेत मुख्याधिकारीचं वरचढ ठरले आहेत. मुख्याधिकारी जगदीश ईटी यांनी सदस्यांनी मांडलेल्या ठरावानुसार संकेश्वरची पाणीपट्टी वर्षाकाठी १५६० रुपये किंवा दोन हजार रुपये आकारणीचे कार्य करावे. अन्यथा कमी पाणीपट्टी अदा करणाऱ्या त्या ४०० नळधारकांची नावे जाहीर करण्याचे आवाहन करजगी यांनी केले आहे.