
हुक्केरी : हुक्केरी हिरेमठाच्या शाखेत 53वा मासिक सुविचार चिंतन कार्यक्रम अर्थपूर्णरित्या पार पडला. श्री चंद्रशेखर शिवाचार्य स्वामीजी यांच्या संकल्पनेतून एका अपंग विद्यार्थ्याला मदतीचा हात देण्यात आला.
कोणाचे व्याख्यान नाही, भाषण नाही, पण कृतीतून सुविचारांचा अर्थ जनतेला सांगण्याचा अनोखा उपक्रम एप्रिलच्या सुविचार चिंतनातून हुक्केरी हिरेमठ शाखेत राबविण्यात आला. इस्लामपूर सरकारी उच्च प्राथमिक शाळेत शिकणार्या किरण फकीरप्पा क्यामनकोळ या विद्यार्थ्याला हात नाहीत. पण त्याची शिकण्याची धडपड सुरु आहे. याची माहिती मिळताच चंद्रशेखर शिवाचार्य स्वामीजींनी एप्रिलचा सुविचार चिंतन कार्यक्रम न घेता, त्याचे पैसे या गरीब विध्यार्थ्याला मदत म्हणून देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार अपंग किरण याला 11 हजार रुपयांची मदत देण्यात आली. याद्वारे चंद्रशेखर शिवाचार्य स्वामीजींनी माणुसकीचे दर्शन घडविले आहे.
याप्रसंगी बोलताना हुबळीचे प्रसिद्ध उद्योजक महेश शिंगे म्हणाले, अन्य मठाच्या तुलनेत हुक्केरी हिरेमठाचे चंद्रशेखर शिवाचार्य स्वामीजी अनेक समाजाभिमुख उपक्रम राबवित आहेत. किरणला त्यांनी मदतीचा हात दिला आहे. त्यामुळे आम्हालाही प्रेरणा मिळाली असून, आमच्या संस्थेतर्फे किरणला कृत्रिम हात बसविण्यात येतील. कोपरापासून किरणला हात नसल्याने अमेरिकेतील तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने हे काम करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.
हुक्केरी तालुका गटशिक्षणाधिकारी मोहन दंडीन यावेळी म्हणाले, हुक्केरी तालुक्यातील हा विद्यार्थी सर्वांसाठी आदर्श ठरला आहे. हात नसले तरी कोपर आणि पायाने लिहिण्यासह स्वतःची कामे तो स्वतःच करतो हे पाहून आनंद वाटतो. हुक्केरी हिरेमठाची शिक्षण खात्याला प्रत्येक बाबतीत मदत होत आहे. आता या विद्यार्थ्याला मठ प्रोत्साहन देत असल्याचे पाहून समाधान वाटते असे त्यांनी सांगितले. यावेळी इस्लामपूर शाळेचे मुख्याध्यापक आणि किरणच्या आई व अन्य उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta