Thursday , December 26 2024
Breaking News

संकेश्वरसाठी आता किटवाड धरणाचा प्रस्ताव : खासदार संजयदादा मंडलिक

Spread the love

संकेश्वर (वार्ता) : सीमाभागातील लोकांना महाराष्ट्रातील किटवाड धरणाचे पाणी मिळवून देण्यासाठी दोन्ही राज्यांच्या पाटबंधारे मंत्रींबरोबर चर्चा करुन प्रस्ताव मांडला जाणार असल्याचे खासदार संजयदादा मंडलिक यांनी सांगितले.
संकेश्वर विश्रामधाम येथे आज कर्नाटक राज्याचे वन आहार व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्तीं, चंदगडचे आमदार राजेश पाटील आणि दोन्ही राज्याचे पाटबंधारे अधिकारांशी चर्चा करुन ते पत्रकारांशी बोलत होते.
ते पुढे म्हणाले, महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्याचे संबंध दृढ आहेत. महाराष्ट्रातील आजराजवळ असलेल्या नियोजित किटवाड धरणाचा लाभ सीमाभागातील लोकांना व्हावा. यादृष्टीने आपण प्रयत्न करीत आहे. यापूर्वी संकेश्वरकरांना चित्री धरणाचे पाणी मिळवून देण्यासाठी बरेच प्रयत्न झाले. पण चित्री धरणात मुबलक पाणीसाठा नसल्यामुळे चित्रीचा करार होऊ शकला नाही. संकेश्वरच्या हाकेच्या अंतरावर महाराष्ट्रातील नांगनूर हे गाव आहे. त्याअर्थी महाराष्ट्र आणि कर्नाटकचे संबंध निकटपूर्व आहेत. आमच्या धरणाचा पाण्याचा लाभ सीमाभागातील आणि सिमेपलिकडे असणार्‍या आमच्या महाराष्ट्रातील लोकांना करुन देण्यासाठी आम्ही किटवाड धरणाचा प्रस्ताव तयार केला आहे. किटवाड धरणाची पाणी क्षमता तीन टीएमसी राहणार आहे. त्यामुळे सीमाभागातील जनतेला विशेष करुन संकेश्वरकरांना मुबलक पाणी मिळणार आहे. किटवाड धरणाचा प्रस्ताव कर्नाटक-महाराष्ट्र राज्यांच्या पाटबंधारे मंत्रींसमोर मांडून त्यावर निर्णय घेतला जाणार आहे. दोन्ही राज्याच्या पाटबंधारे मंत्री महोदयांनी किटवाड धरणाला हिरवा कंदील दाखविला तर दोन्ही राज्याचे मुख्यमंत्री एकत्र चर्चा करुन सदर प्रस्तावाला निश्चितच मान्यता देतील, असे त्यांनी सांगितले. किटवाड धरणाच्या प्रस्तावाला मंत्री उमेश कत्ती व आमदार राजेश पाटील यांनी आपली सहमती दर्शवली आहे.
यावेळी अजित नडगदल्ली, बसवराज हंजी, अमरनाथ घुगरी, आर. एस. पाटील, सुरेश कुराडे, बाबासाहेब आरबोळे, उदयकुमार देसाई, राम पाटील, राजू मुळदी, माजी नगराध्यक्ष श्रीकांत हतनुरी, सभापती सुनिल पर्वतराव, नगरसेवक अमर नलवडे, संजय शिरकोळी, अ‍ॅड. प्रमोद होसमनी, गंगाराम भूसगोळ, डॉ. मंदार हावळ, हारुण मुल्ला, रोहन नेसरी, अभिजित कुरणकर, महेश सुगते, संदिप दवडते, नंदू मुडशी, कार्यकर्ते उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

हरगापूरगड (ता. हुक्केरी) ग्राम पंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष बिनविरोध

Spread the love  हुक्केरी : हरगापूरगड (ता. हुक्केरी) येथील ग्राम पंचायत अध्यक्ष व उपाध्यक्ष पदी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *